गावकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
चंद्रपूर : तालुक्यातील चोरगाव, वरवट, मामला, वायगाव, दुधाळा, निंबाळा अडेगाव इत्यादी गावातील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई विभागाने सुरू केलेली आहे. जबरानजोतधारकांच्या शेतातील उभ्या पिकांमध्ये जेसीबी टाकण्याच्या कारवाईचा विरोध करीत गावकऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
30 डिसेंबर रोजी वरवट शिवारामध्ये चोरगाव निवासी मोहुर्ले यांच्या शेतातील उभ्या पिकामध्ये जेसीबी टाकून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. लोकांनी एकत्रित येऊन अनेक दशकांपासून वहीवाट असलेल्या जमिनीवर पिक उभे असतांना कारवाई करण्याचा विरोध केला. पिका भोवताल जेसीबी चालल्यानंतर वनविभागाने स्थानिक लोकांचा रोष पाहून माघार घेतली. यानंतर पीडित नागरिकांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क केला. देशमुख यांनी तातडीने मोहुर्ले यांच्या शेतामध्ये भेट देऊन पाहणी केली व सर्व पीडित लोकांची चोरगाव येथे बैठक घेतली.यानंतर आज दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बफरझोन मधिल शेकडो जबरानजोत धारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्या वरखेडकर यांना पत्र देऊन वन विभागाची अतिरेकी कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी पीडित नागरिकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर यांच्याकडे केली.