ओबीसी आरक्षण, ओबीसी जनगणना व ओबीसींच्या इतर मागण्यासाठी देशात सर्वत्र ओबीसी प्रवर्ग आक्रमक होत असतांना भाजपा ने मंदिर उघडण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन केले याला प्रतिउत्तर देत ओबीसी नेत्या डॉ ऍड अंजली साळवे यांनी 'ते मंदिर म्हणतील, पण आता आपण ओबीसी गणेनेच्या मागणीवर ठाम राहू' असे आवाहन ओबीसी प्रवर्गाला केले आहे.
केंद्र सरकारने जनगणना 2021 चा कार्यक्रम 2019 या वर्षी जाहीर करताच ओबीसी प्रवर्गाचा जनगणना नमुना प्रश्नावलीत रकाना नसल्याने ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी न्यायालया पासून संसदेपर्यंत ओबीसी जनगणनेचा प्रश्न पोहचवून डिसेंबर 2019 ला महाराष्ट्राच्या विधिमंडळात ओबीसी जनगणेनेच्या ऐतिहासिक ठरावाची मागणी व त्याची पूर्तता करीत,जंतर मंतर येथे ओबीसी का ऐलांन पाटी लगाओ अभियान आंदोलन करीत पाटी लावा मोहिमेच्या माध्यमातून ओबीसी जनजागृती सुरू करणा-या डॉ ऍड अंजली साळवे केंद्र सरकार विरोधात आक्रमक लढा देत आहेत.
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात शाळा, महाविद्यालये, प्रार्थना स्थळे व इतर सर्वच सार्वजनिक ठिकाणांसाठी शासनाने नियम लावलेले आहेत. अश्यातच नुकतेच भाजप ने मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. राज्यात अनेक ठिकाणी लोकांनी घंटानाद आंदोलनात सहभाग घेत आंदोलन केले. याला प्रतिउत्तर देत मंडलच्या वेळी आक्रमक झालेल्या ओबीसींच्या हाती कमंडल देऊन भाजपाने ओबीसीना भावनिक केल्यानेच मंडल आयोगाच्या इतर अनेक शिफारशी लागू करता आल्या नाहीत आणि आता कोरोनामुळे जनगणना कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि ओबीसी जनगणना मागणी तीव्र होत असताना मंदिर उघडा या भावनिक मागणीवरून जास्तीत जास्त ओबीसी आक्रमक होतील आणि ओबीसी जनगणनेची मागणी मागे पाडण्याची खेळी भाजपाने खेळल्याची खंत डॉ साळवे यांनी व्यक्त केली.
भाजपाच्या या भावनिक मुद्द्यावरील राजकारणाचा भाग न होता 'ते मंदिर म्हणतील, पण आता आपण ओबीसी जनगणेनेच्या मुळ मुद्यावर ठाम राहू, असे कळकळीचे आवाहन डॉ. साळवे यांनी सर्व ओबीसी बांधवांना केले आहे.