Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०२, २०२१

ग्राहकांनी मूर्तिकारांकडून मातीच्या मूर्तीची प्रमाणित पावती घ्यावी CMC Chandrapur Ganeshotsav




ग्राहकांनी मूर्तिकारांकडून मातीच्या मूर्तीची प्रमाणित पावती घ्यावी

मनपा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक

चंद्रपूर, ता. २ : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून, विक्री, आयात आणि निर्मिती होताना आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मूर्तीची खरेदी करताना ती मातीचीच असल्याची प्रमाणित पावती ग्राहकांनी घ्यावी आणि ती मूर्तिकरांनी आपल्या स्वाक्षरीनिशी संपर्क क्रमांकासह द्यावी, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले.

चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी अधिकारी आणि मूर्तिकार यांची मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (ता. २) बैठक घेण्यात आली. यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील, उपअभियंता अनिल घुमडे, उपअभियंता विजय बोरीकर, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी आणि मूर्तिकार प्रतिनिधींची उपस्थिती होती.

अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा घेतला. सार्वजनिक गणेश मंडळानी मंडप उभारतांना वाहतुकीस अडथळा करु नये, ध्वनीक्षेपक लावताना आवाजाची तीव्रता कमी असावी, ध्वनीप्रदूषण होणार नाही काळजी घ्यावी, मूर्ती घेऊन जाताना आगमन आणि विसर्जन मिरवणूक निघणार नाही, याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक गणेश मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दर्शन व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या.  

जलप्रदूषण टाळण्यासाठी रामाळा तलाव तेथे विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्यात आले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून ४ कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात येणार आहेत. तसेच शहरात विविध ठिकाणी एकूण २४ कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. घरगुती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी फिरते विर्सजन कुंड आणि निर्माल्य कलश सेवेत राहणार आहेत.

शहरात एकही पीओपी मूर्तीची स्थापना आणि विक्री होणार नाही, यासाठी कठोर पावले उचलण्यात आली असून, त्यासाठी झोननिहाय ३ पथके नियुक्त करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने तपासणी केली जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची विक्री होते. अशावेळी पीओपीच्या मूर्ती बाजारात विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी विक्रीच्या ठिकाणी मनपाच्या विशेष पथकाद्वारे प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. शंका वाटल्यास मूर्तीचे नमुने ताब्यात घेऊन चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे. गणेशोत्सवासह शारदोत्सव आणि दिवाळीत लक्ष्मीपूजन काळातही पीओपी मूर्ती विकली जाऊ नये, यासाठी मोहीम कायम ठेवण्यात येणार आहे.


यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव व्हावा, यासाठी मनपाद्वारे व्यापक जनजागृती केली जात आहे. त्यास मूर्तिकार, भाविक, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फिरते व स्थायी विसर्जन कुंड ठेवण्यात येणार असून, निर्माल्य आणि मूर्तीच्या मातीचा सदुपयोग केला जाईल. ज्यांच्याकडे पीओपो मूर्ती असतील त्यांनी एकत्रित जमा करावी, यासाठी मनपा जागा उपलब्ध करून देईल.
- राजेश मोहिते, आयुक्त मनपा 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.