▪️श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
04 ऑगस्ट: ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेलीवरमुळे श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. कुठल्याही रुग्णालयात दाखल होण्यास भाऊंनी नकार दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाऊंवर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट करण्यात येत होती. काल (3 ऑगस्ट) सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला.. तब्येत अधिक सिरीयस झाली.. मेडिकल टीमने शर्थीचे प्रयत्न केले..मात्र त्यांना यश मिळाले नाही. आज सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान या दुःखद घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे शेगावात दाखल झाले आहेत.
‘सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ म्हणजे माणसामधला देवमाणूस..वयाच्या अठराव्या वर्षी श्री आज्ञेने शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्री नुसार काम करत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कुठलाही मोबदला न घेता संपूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने काम करणारे मंदिरातील हजारो सेवाधारी, डोनेशन सारख्या आर्थिक लाभला डावलून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थानच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, भक्तनिवास, जागतिक किर्तीचा आनंदसागर प्रकल्प..आणि अशा अनेक सेवाकार्याची उभारणी शिवशंकरभाऊंनी केली. श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ञ, नियोजन तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. असा हा कर्मयोगाचा दीपस्तंभ आज अकाली विझला आहे.. शिवशंकरभाऊंच्या अकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.. शिवशंकर भाऊंना श्री चरणी चिरशांती लाभो हीच प्रार्थना.
शिवशंकरभाऊंच्या निधनाने विवेकानंद केंद्राने आत्मज गमावला.. |
पुणे : विवेकानंद केंद्र परिवाराने शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एक आत्मज गमावला आहे अशी प्रतिक्रिया केंद्राचे महासचिव भानुदासजी यांनी व्यक्त केली आहे.
Shivshankar Patil Shegao Gajana mandir
शिवशंकरभाऊ हे शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक होतेच, परंतु ते एक सच्चे विवेकानंद भक्त, निष्काम कर्मयोगी, पारदर्शी आर्थिक व्यवहार जगणारे विनम्र विश्वस्त होते. आपल्या अबोल कृतीतून त्यांनी विवेकानंद केंद्र कार्यकर्त्यांनाच नव्हे तर गजानन महाराज संस्थानच्या कोट्यवधी साधकांना, सेवकांना व भक्तांना खूप काही शिकवले अशी प्रतिक्रिया भानुदासजी यांनी व्यक्त केली आहे.
2013 साली स्वामी विवेकानंद यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद सार्ध शती महोत्सव समितीचे ते महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते. विवेकानंद केंद्राचे अनेक मोठे व महत्वाचे कार्यक्रम त्याकाळात शेगाव संस्थानामध्ये पार पडले. भाऊ त्या कार्यक्रमांना उपस्थित असत, परंतु संस्थानामधल्या चहाच्या कपालाच काय, लवंग-वेलदोड्यालाही भाऊ स्पर्श करीत नसत हे अनेकांना स्पर्शून जात असे अशी आठवण सार्ध शती महोत्सव समितीचे तत्कालीन सचिव सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केली..
विश्वस्त या संकल्पनेला सर्वार्थाने जागणारा, संस्थानसाठी कोट्यवधी रूपयांच्या देणग्या मिळत असतानाही, जेवढ्या रकमेचा विनियोग करणे संस्थानला शक्य आहे, व जेवढ्याची गरज आहे तेवढीच रक्कम स्वीकारणारा, संस्थानच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद पूर्ण झाल्यानंतरच घरी परत जाणारा असा विश्वस्त होणे नाही अशी प्रतिक्रिया विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट यांनी व्यक्त केलीआहे.
Shivshankar Patil Shegao Gajana mandir