चंद्रपूर दि. 4 जून:- किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने १८ जून रोजी शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळण्यात येणार आहे. १८ जून १९५१ रोजी झालेल्या पहिल्या घटनादुरुस्तीमुळे भारतीय शेतकरी गुलाम झाला असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.
या आंदोलनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रम करता येत नसला तरी प्रत्येक किसानपुत्राने १८ जून रोजी काळी फीत लावून शेतकर्यांना गुलाम करणार्या या घटनादुरुस्तीचा निषेध करावा.
घटना स्वीकारल्यानंतर अवघ्या दीड वर्षात, घटनेच्या अनुच्छेद ३१ ए व बी मध्ये दुरुस्ती करून मूळ घटनेत नसलेल्या परिशिष्ट ९ ची निर्मिती करण्यात आली. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. अशी तजवीज करण्यात आली. आज या परिशिष्टात २८४ कायदे असून त्यापैकी सुमारे अडीचशे कायदे थेट शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. हा योगायोग नसून जाणीवपूर्वक व हुशारीने शेतकर्यांना गुलाम बनविण्यात आले आहे. सीलिंग, आवश्यक वस्तू हे नरभक्षी कायदे या परिशिष्टात टाकल्यामुळे ते गेली अनेक वर्षे टिकून राहिले आहेत. हे कायदे म्हणजे विषारी साप आहेत व परिशिष्ट ९ हे त्यांचे आश्रय स्थान आहे.
व्याख्यान-
शेतकरी पारतंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील अॅड. सागर पिलारे यांचे ओंनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ते किसानपुत्र आंदोलनाच्या सोशल मिडीया वरून १८ जून रोजी प्रसारित करण्यात येईल.
काळी फीत व लोकप्रतिनिधीना निवेदन
सीलिंग, आवश्यक वस्तू आदी नरभक्षी कायदे तसेच परिशिष्ट ९ रद्द करावे या मागणीचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन प्रमुखांना किसानपुत्र देणार असून त्या दिवशी सर्व शेतकारी हितचिंतक आणि स्वातंत्र्य प्रेमींनी काळी फीत लावावी असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब, सुभाष कछवे, दीपक नारे, मयूर बागुल, असलम सय्यद, नितीन राठोड, अमीत सिंग, राजीव बसर्गेकर, अनंत देशपांडे, अॅड महेश गजेंद्रगडकर, हरीश नातू आदींनी केले आहे.