नागपुर 12 जून, " माती, पाणी आणि बियाणे" हे तीन ब्रम्हा-विष्णू-महेश आहेत असे मानून शाश्वत शेतीचे कार्य चालते. शेतीची दशा बघण्याआधी मनुष्याची आताची दशा काय आहे याचा विचार करून शेतीची दिशा ठरविली जावी "असा मोलाचा विचार श्री रमेश साकरकार यांनी ग्रामायण प्रतिष्ठान द्वारा आयोजित "कृषी ची दशा व परिवर्तनाची दिशा "या विषयावरील पंधरा दिवसीय व्याख्यानमालेतील 8 वे पुष्प गुंफतांना प्रकट केला.
रमेश साकरकार 32 वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. स्वतःच्या तीन एकर शेतीत 70 ते 80 उभे पीक ते दरवर्षी घेतात. नवधान्य बीज बँक त्यांनी स्थापित केली आहे, त्यात 272 प्रकारची देशी वाणं आहेत.
सेंद्रिय शेती बद्दल त्यांच्या वडिलांनी सांगितले की दाट दुट बोना, तो घर मे सोना, पतला पतला बोना तो सालभर रोना. आईने सांगितले नया नो दिन, पुराना सौ दिन म्हणजेच आपल्या पूर्वजांना सेंद्रिय शेती बद्दल चांगलाच अनुभव होता, असे ते म्हणाले.
या व्याख्यानात श्री साकरकार यांनी त्यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांबद्दल वेगवेगळे फोटो दाखवून आपले अनुभव कथन केले. देशी बीज याची विशेषता सांगताना त्यांनी सांगितले की, या बीजांच्या मुळ्या लांब व जास्त असतात त्यामुळे रोप दणकट होते धान्य चविष्ट व पौष्टिक तेनी भरपूर, रोगप्रतिकारक शक्ती असलेले, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता असलेले असते. बी तयार झाले की, शेतात फेरफटका मारत असताना चांगले दणकट वाण बघून ते वेगळे काढून त्यांचा संग्रह करता येतो त्यामुळे बियांसाठी बाजारावर अवलंबून राहण्याची गरज नसते.
श्री साकरकार यांच्या शेतावर कॉलेजचे अनेक विद्यार्थी सहली प्रमाणे येतात व परस बागेचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेऊन जातात. धामणगाव तालुक्यातील 55 प्राथमिक शाळांमध्ये गावरान बियांच्या परसबागा आहेत, त्यातूनच शाळेतील पोषण आहार कार्यक्रम चालविला जातो.
गावरान बिया जपण्याच्या आवडीमुळे त्यांच्याकडे दोडक्याचे अनेक प्रकार जसे शिरांचे दोडके तेल्या दोडके झुणका दोडके वगैरे, शहानूर तूर, धामणाज्वारी गुलाबी मुळे, काशी टमाटर ,मेळघाट टमाटर, अनेक प्रकारची वांगी आणि अनेक प्रकारचे देशी बीज संग्रहित झाले आहेत.
आपली बीज बॅंक दाखवताना त्यांनी सांगितले की कार्यशाळा किंवा बीज महोत्सवाच्या वेळेस स्त्री-पुरुष मुठी ने बीज घेऊन जातात आणि ओंजळीने परत करतात. अशा प्रकारे ही बँक वाढत राहते. किडींचा बंदोबस्त ही व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क वगैरे सेंद्रिय उपाय वापरून केला जातो. अनेक नवीन कल्पना त्यांनी राबविल्या आहेत. वीस बाय वीस फूट जागेत सप्तचक्र बनविले आहे. 55 ते 60 फुटांचा एक भाग एका गोलाकारात सात भाग बनविले, प्रत्येक भागात एक भाजी लावली म्हणजे आठवड्याच्या सात दिवस वेगवेगळी भाजी मिळते. तसेच कृषी प्रदर्शनाच्या वेळेस स्टॉल घेण्यापेक्षा ते वेगवेगळी कणसे आपल्या शरीरावर धारण करतात, याप्रकारे त्यांच्या देशी वाणांची माहिती सगळ्यांना होते. साकरकार वर्षातून तीन कृषी विषयक कार्यक्रम घेतात.
15 मे बीजोत्सव, 2आक्टोबर रगबी बीज मेळावा आणि 25 डिसेंबर पीक पाहणी मेळावा.
- तसेच त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम दिला आहे.
- गावोगावी बीज महोत्सव भरवून महिलांना देशी वाणाची ओळख करून देणे.
- शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना बियांसाठी दत्तक घेणे
- महाविद्यालयातील मुलांना शेतीविषयक धडे देणे.
- धान्याचा उपयोग दारू बनविण्यासाठी न करता व्यसनमुक्ती करणे.
- पूर्वजांच्या अनुभवावर आधारित बीज विद्यापीठ स्थापन करणे.
याप्रकारे शाश्वत शेती बद्दल बियांच्या देशी वाणाच्या संवर्धनाबद्दल अतिशय मूलभूत विचार साकरकार यांनी मांडले. दर्शकांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे ही मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ अनुराधा सांबरे यांनी ग्रामायणची भूमिका मांडली. कृषीअभियांत्रिकी महाविद्यालय पिंपळखुटाचे प्राध्यापक श्री दीपक बोंद्रे यांनी श्री रमेश साकरकार यांचा परिचय दिला. श्री साकरकार यांना एम. एस .स्वामीनाथन फेलोशिप, दीनदयाल पुरस्कार, आपुलकी पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. व्याघ्र प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना साकरकार यांनी परस बागांचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले. त्यांच्या शेताला आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. या सुंदर कार्यक्रमाची सांगता किशोर केळापुरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.