Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १३, २०२१

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि महात्मा गांधी





चंद्रपूरच्या सावली गावात पार पडलेले महात्मा गांधींचे अधिवेशन

महात्मा गांधी यांनी फेब्रुवारी १९२७, नोव्हेंबर १९३३ व फेब्रुवारी-मार्च १९३६ अश्या तीन वेळेला चंद्रपूरला भेटी दिल्या होत्या. त्यापैकी पहिल्या दोन भेटी या अल्पकालीन, धावत्या भेटी होत्या. परंतु तिसरी भेट विस्तृत स्वरूपाची भेट होती. त्या भेटीचे निमित्त होते - गांधी सेवा संघाचे दुसरे वार्षिक अधिवेशन.

हे अधिवेशन २९ फेब्रुवारी ते ६ मार्च १९३६ दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या गावी पार पडले. जमनालाल बजाज यांच्या सांगण्यावरून ग्रामीण भागात हे अधिवेशन घेण्याचे ठरले व त्यासाठी सावली गावाची निवड करण्यात आली. त्यासाठी वेगवेगळ्या प्रांतातील सेवा संघाच्या सदस्यांना अधिवेशनाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. देशभरातून जवळपास १५० प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आणि इतर विधायक कामासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावली गावात दाखल झाले.

२८ फेब्रुवारी १९३६ रोजी चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) रेल्वे स्थानकावर महात्मा गांधींचे आगमन झाले. महात्मा गांधींसमवेत डॉ. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य विनोबा भावे, जमनालाल बजाज, काकासाहेब कालेलकर, दादासाहेब धर्माधिकारी, शंकरराव देव, महादेवभाई देसाई आदी प्रभूती सुद्धा होत्या. चंद्रपूरचे नगराध्यक्ष खुशालचंदजी खजानची व महेशदासजी भोजक यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले, आणि या साऱ्यांना मुलमार्गे सावलीला जाण्यासाठी वाहनव्यवस्था उपलब्ध करून दिली. नेमक्या त्याच दिवशी कमला नेहरू यांचे देहावसन झाल्याने पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाला येऊ शकले नाही. सावली मध्ये १९२७ साली खादी ग्रामोद्योग संघाची सुरुवात झाली होती. या गावात महार समाजाची (हरीजनांची) संख्या पुष्कळ होती व प्रामुख्याने हाच समाज सूतकताई करीत होता. याच गोष्टी विचारात घेऊन सावलीची निवड करण्यात आली होती. सावलीचे वेंकण्णा दिवाणजी यांच्या मदतीमुळे गावातील एका शेतात केवळ २ रुपये नाममात्र शुल्क आकारून अधिवेशनाची जागा निश्चित करण्यात आली. चंद्रपूरचे डॉ. वाईकर यांनी औषधालयाची जबाबदारी स्वीकारली होती. तर गोंदियाचे श्री.चतुर्भुज यांनी आठ दिवसांसाठी मोटारगाडी उपलब्ध करून दिली होती. सावलीच्या खादी संघाचे रामदास गुलाटी यांनी मंडपव्यवस्था सांभाळली होती.




अधिवेशनाच्या स्थळी हस्तोद्योगाचे एक छोटेखानी प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले होते, ज्यात निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या सदस्यांनी आपापल्या प्रांतातील हस्तोद्योगाच्या वस्तू आणल्या होत्या. दैनंदिन उपयोगातील वस्तूंखेरीज बांबूची चाळणी, पीठाची गिरणी, वनस्पती तेलावर चालणारे कंदील, शिवणकामाचे यंत्र इ. वस्तू त्यात होत्या. जुन्नरचे कागद, मालवणची चटई यांखेरीज पोंभूर्णाची लाकडी खेळणी अश्या अनेक वस्तू प्रदर्शनात होत्या. सावली खेरीज भंडारा जिल्ह्याच्या किन्ही गावातील वैशिष्ट्यपूर्ण सुतकताईपद्धती समजून घेणे हा या प्रदर्शनाचा एक महत्वपूर्ण उद्देश होता. महाराष्ट्र चरखा संघाने या स्थळी काही स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या. ज्यात सावली व आजूबाजूच्या इतर गावातील लोकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. दररोज आठ ते नऊ तास चरखा फिरवत अधिकाधिक सूतकताई करणाऱ्यांसाठी बक्षिसांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान जवळपास सव्वा लाख गज इतकी सूतकताई झाली व त्यातून जमा झालेले २५० रुपये पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आले. महात्मा गांधींच्या पुतण्याच्या मुलाचा म्हणजेच कृष्णदास गांधी आणि मनोज्ना यांचा विवाह ५ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजता तेथेच एका आंब्याच्या झाडाखाली अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. विवाहाचा खर्च केवळ २ रुपये आला.

या प्रदर्शनासंबंधी बोलताना महात्मा गांधी म्हणाले -
"ज्यांनी देशाच्या विविध भागातून प्रदर्शनासाठी वस्तू आणल्या त्यावरून त्या कुठल्या भागातून आल्या ते मी ओळखू शकतो. पण मला सांगावेसे वाटते की तुम्ही या गावातील व आजूबाजूच्या परिसरात बनवल्या जाणाऱ्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करायला हवे. ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतो त्या वेळेस आपण या संभाव्यतेचा शोध घ्यावा आणि ते प्रदर्शन यशस्वी करण्यात सक्षम असलेल्या स्थानिक गोष्टींना महत्त्व द्यायला हवे. प्रदर्शनाचे रूपांतरण संग्रहालयात होणार नाही हे आपण पहायला हवे. प्राचीन ऐतिहासिक संग्रहालयांना निश्चितच अनन्यसाधारण महत्व आहे परंतु आर्थिक स्वावलंबन व स्वयंपूर्णता यांवर आधारित व हस्तकला आणि उद्योग यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांना विशेष महत्व नाही. स्थानिक पातळीवरील लघुउद्योगाचे पुनरुज्जीवन करणे हे आपले महत्वाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपले कार्य आपण ज्या लोकांच्या मध्यभागी उभे आहोत त्यांच्या हितासाठी असायला हवे. आपली प्रत्येक कृती त्यांचा किती फायदा करून देणार आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा."

(लेखन व संपादन - अमित भगत)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.