आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश
शिरीष उगे (वरोरा/भद्रावती प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती येथील युवक, युवती मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे. परंतु क्रीडा क्षेत्रात ते मागे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता त्यांच्याकरिता अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणे गरजेचे होते. त्याकरिता या क्षेत्राच्या महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. हि मागणी पूर्ण करीत त्यांनी वरोरा, भद्रावती तालुक्यातील क्रीडा संकुलाला प्रत्येकी पाच कोटी रु मंजूर केले आहे. त्यामुळे येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न आता निकाली लागणार आहे.
सदर संकुलामध्ये २०० मी. ट्रॅक, खो - खो, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट, पार्किग परीसर, पाण्याची सुविधा, प्रेक्षक गॅलरी, संरक्षण भिंत, चौकीदार केबिन, प्रवेशद्वार, चेंजिग रूम, प्रसाधन गृह, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण इ सुविधांचा ढोबळ मानाने समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे राहायला हव्या. या विधानसभा क्षेत्रातील आमदार देखील पहिल्यांदा महिला मिळाली आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात देखील महिलांनी पुढे यावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. या क्रीडा संकुलामुळे येत्या काळात या भागातून क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू या मातीतूनच जावे. असे मत त्यांनी व्यक्त केले. या भागातील क्रीडा प्रेमींनी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकरांच्या पाठपुराव्यातील यशाबद्दल आभार मानले आहे.