चंद्रपूर/ प्रतिनिधी :
चंद्रपूरचे आमदार निवडून येण्या आधीपासूनच खोटी आश्वासने अन भुलथापा देत आहेत. २०० युनिट वीज मोफतची खोटी भूल देऊन विधानसभा जिंकली. आता कोरोनाच्या महामारीत आमदार खोटी आश्वासने अन भुलथापा देत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील 10 व्हेंटिलेटर तर 14 ऑक्सिजन बेड गोर गरिब रुग्णांसाठी सुरु, असे प्रसिद्धीपत्रक काढून प्रसिद्धी मिळविली. मात्र, प्रत्यक्षात ऑक्सिजन बेड सुरु झालेच नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे उजेडात आणून दिल्यानंतर आमदार महोदयांच्या पाठिराख्यांच्या पोटात दुखू लागले आणि मनपाची खोटी बदनामी सुरु केली. खोटी आश्वासने अन भुलथापांची प्रसिद्धी बंद करा, असे प्रतिउत्तर मनपाचे स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी बलराम डोडानी यांना दिले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच मनपा आणि भाजपचे पदाधिकारी सक्रिय काम करीत आहेत. मनपाचे आरोग्य विभाग आणि स्वच्छता कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवेत आहेत. मृताच्या अंत्यविधीचे काम देखील मनपा कर्मचारी करत आहे. तरीही काही राजकारणी मृत्यूचे तांडव बघत असल्याचा घाणेरडा आरोप करीत आहेत, असे उत्तर मनपाचे स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी दिले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. हे कोव्हीड रुग्णालय सुरु करण्यासाठी येणाऱ्या अंदाजे रु. २.२५ कोटीच्या संभाव्य खर्चाला मंजुरी देण्यात आली. आम्ही लवकरच सर्वसोयी युक्त रुग्णालय नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करू. आमदार किशोर जोरगेवार यांनी आजवर दिलेली किती आश्वासने पूर्ण झालीत, मागील दीड वर्षात नेमके काय केले, याचा हिशेब द्यावा, असेही मनपाचे स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटी रुपयांचा निधी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला दिला. पण, एवढ्या कमी निधीमध्ये खरोखरच रुग्णालय आणि सर्व सुविधा उपलब्ध होतील काय?, एका कोटीत कोरोना प्रतिबंध होईल काय? केवळ प्रसिद्धीसाठी मनपाला बदनाम करण्याचे काम आमदार आणि त्यांच्या पाठीराख्यानी बंद करावे, असेही सभापती रवी आसवानी यांनी म्हटले.