कारवाईत १८ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल
चंद्रपूर, ता. २० : राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ एप्रिलपासून महानगरपालिका हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. २०) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या पाच प्रतिष्ठित प्रतिष्ठानांवर कारवाई करून १८ हजार ५०० रूपयाचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. एकच्या सहायक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, स्वच्छता निरीक्षक उदय मैलारपवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत जावा बुलेट शोरूम, ईरई होंडा शोरूम, एन.डी. हिरो होंडा शोरूम, निशांत मोबाईल शाँपी, कल्पना मोबाईल शाँपी या प्रतिष्ठानांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान काही प्रतिष्ठानांच्या मालकांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत अकारण वाद घालण्याचा प्रयत्न केला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.
शहरातील वाढते कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या कोरोना नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. तसेच कारण नसताना घराबाहेर पडू नका, नियमित मास्कचा वापर करा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही महापौरांनी केले.