Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १५, २०२१

जैन रामायण

जैन रामायण 


रामायण आपण जाणतोच,आता आपण जैन रामायण पाहु. जैन रामायणांत रामाला पद्म म्हटले आहे. ६३ महापुरुषांपैकी तो एक मानव होता.

फेसबुक लिंक http://bit.ly/3tj7QY8
या जैन रामायणांतही इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेले विमलासुरीचे माहाराष्ट्री या प्राकृत भाषेत लिहिलेले रामायण, आठव्या शतकात लिहिलेले पौमाचरिया रामायण, ११व्या शतकामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेली रविसेनकृत पद्मपुराण, व अपभ्रंश भाषेत लिहिलेले स्वयंभूदेवलिखित पौमचरियु ही प्रमुख संस्करणे आहेत.

जैन रामायण ,

जैन परंपरेत राम, लक्ष्मण आणि रावण हे तिघेही ६३ शलाका पुरुषांपैकी तिघेजण आहेत. त्यामुळे जैन साहित्यात रामकथेला महत्व येणे सहाजिकच आहे.Ⓜ
जैन रामायणाची अनेक संस्करणे आहेत. सर्वात जुने जैन रामायण हे आचार्य विमलसुरी यांनी लिहिलेले "पौमचरयु" हे आहे (इ.स. ३रे शतक ). हे रामायण महाराष्ट्रीयन भाषेत आहे. वाल्मिकी रामायणातील प्रक्षिप्त, चमत्कारिक  आणि न पटणा-या गोष्टी, घटना काढून टाकून आचार्य विमलसुरी यांनी हे वास्तव रामायण लिहिले. 
पुढे आचार्य संघदासगणी यांनी वसुदेव हिंडी या ग्रंथात, आचार्य गुणभद्र यांनी उत्तर पुराणात, आचार्य हेमचंद्र यांनी त्रिशष्टी शलाका पुरुष या ग्रंथात रामाची कथा विस्ताराने लिहिली आहे.
जैन रामकथेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ती रामकथेने नव्हे तर रावणाच्या कथेने सुरू होते, या कथेत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा जन्म निसर्ग नियमाने झाला असून त्यामागे कोणा ऋषिने दशरथाच्या राण्यांना पुत्रप्राप्तीसाठी फळ देणे वगैरे प्रकार नाही. येथे रावणाला दहा तोंडे नसून एकच तोंड आहे. मारुती आणि त्याचे साथीदार वानर नसून प्रगत मानव आहेत, त्यामुळे त्यांना शेपट्या वगैरे प्रकार नाहीत. मारुती रामाचा दास किंवा भक्त नसून मित्र आहे.

विशेष म्हणजे रावणाशी झालेल्या युद्धात त्याला रामाने मारले नसून लक्ष्मणाने मारले. जैन रामायणात सीतेविषयी धोब्याने रामाकडे चहाडी करणे ही गोष्ट नाही आणि सीतेची अग्निपरीक्षा, निष्कासन हा प्रकारही नाही.  शम्बुकाची कथा आहे, पण तो शूद्र असून तप करतो म्हणून रामाने त्याला मारणे हा प्रकारही नाही, तर त्या तपस्व्याला भेटायला गेलेल्या लक्ष्मणाकडून तो चुकून मारला जातो अशी कथा आहे.Ⓜ
जैन रामायणाप्रमाणे दशरथ आणि भरत ह्या दोघांनाही जैन मुनी व्हावे असे वाटत होते. राम वनवासात गेल्यावर भरत गृहस्थाश्रमी जीवन जगू लागला, पण शेवटी तो जैन मुनी झाला. इतकेच नाही तर रावणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जैन मुनी झाला. सीतेच्या लव-कुश ही दोन्ही मुलांना आणि हनुमान, बिभी़षण यांना जैन मुनी होण्याचे भाग्य लाभले. सीतेचे हरण झाल्यावर दु:खी झालेला राम जैन मुनींची प्रवचने ऐकत असे. मुनींनी रामाला जीवनाची नश्वरता समजावून सांगितली आणि संसाराचा मोह कसा व्यर्थ आहे हे पटवून दिले. अखेरीस रामाने स्वर्गात जाण्यापूर्वी कैवल्य नावाचे उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त केले.जैन रामायणात, रावणाला जैनांचे २०वे तीर्थंकर मुनिसुव्रताचे भक्त म्हटले आहे. मुनींचे म्हणणे ऐकून रावणाने सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श न करण्याचे ठरवले. आपली पत्नी मंदोदरी आणि हनुमान यांच्याकडून जैन प्रवचने ऐकल्यावर रावणाने मनोमन निश्चय केला की, रामाला युद्धात पराजित केल्यावर सीतेला त्याच्या स्वाधीन करायचे. एका जैन रामायणात असेही म्हटले आहे की राम युद्धात रामाकडून नाही तर लक्ष्मणाकडून मारला गेला, कारण राम हा अहिंसाव्रताचे पालन करीत होता.
इतर कोणत्याही परंपरेत  नसणारे एक अधिकचे पात्र जैन रामायणात आहे, ते म्हणजे भामंडल. हा भामंडल सीतेचा भाऊ आहे.परंतु त्याच्या विषयी हे रामायण आधिक माहिती देत नाही.यावरून दिसते की रामायण जैन संस्करणे वाल्मिकी रामायणपेक्षा वेगळी आहेत. सगळा भर पात्रांच्या जैन मुनी बनण्यावर आणि अहिंसेच्या पालनावर आहे.

______________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
______________________________

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.