भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणतीच टीका केलेली नसताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणे दुर्भाग्यपूर्ण आहे. नाना पटोले यांनी भ्रमातून बाहेर यावे आणि आरोप – प्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून कोरोनाकाळात जनतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केले.
मा. केशव उपाध्ये म्हणाले की, मा. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. प्रत्यक्षात मा. प्रदेशाध्यक्षांनी अशी कोणतीही टीका केलेली नाही. काल त्यांच्या नावे एक व्हॉट्स अप पोस्ट काही ग्रुपमध्ये फिरत होती. ती भाजपाने प्रसिद्ध केलेली अधिकृत प्रेसनोट नव्हती. पण नानाजींनी मात्र तो मजकूर प्रमाण मानून भाजपा प्रदेशाध्यक्षांवर टीका केली आहे, असे दिसते. सध्याचे कोरोनाचे महाराष्ट्रातील संकट मती गुंग करणारे असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भ्रमात राहू नये. सत्ताधारी पक्षाचे नेतेच कल्पनेत जगत राहिले तर जनतेला मदत कोण करणार हा प्रश्न आहे.
त्यांनी सांगितले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष पुण्याचे सेवक आहेत की, पूनावालाचे असा सवाल मा. नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. मा. प्रदेशाध्यक्ष हे कोथरूडचे आमदार असल्याने त्या मतदारसंघाचे सेवक आहेत, कोथरूडचा समावेश असलेल्या पुण्याचे सेवक आहेत आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते संपूर्ण महाराष्ट्राचे सेवक आहेत. कोरोनाच्या संकटात मा. प्रदेशाध्यक्षांच्या पुढाकाराने पुणे शहरात भाजपाने पहिल्या लाटेत प्रभावी सेवाकार्य केले आणि आता दुसऱ्या लाटेतही नव्या जोमाने सेवाकार्य चालू आहे. पूनावालांची उठाठेव करण्यापूर्वी नाना पटोले यांनी भाजपाच्या पुण्यातील सेवाकार्याची दखल घेतली असती तर बरे झाले असते. नानाजींनी आपल्या मतदारसंघात किती सेवाकार्य केले त्याची माहिती जाहीर केली आणखी चांगले होईल.