Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २०, २०२१

कोरोनाचा उद्रेक वाढतोय: बुधवारपासून जनता कर्फ्यू


Ø वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडचे नियोजन करा

Ø आवश्यकता भासल्यास शोर्ट टेंडरद्वारे साहित्याची खरेदी करा


चंद्रपूर दि. 20 एप्रिल: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून पुढील काही दिवस 'ब्रेक द चेन ' मोहिमेअंतर्गत जनता कर्फ्यू ठेवला जाणार आहे. त्याला जनतेने साथ दयावी. रुग्ण संख्येतील वाढ लक्षात घेता जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, वाढविण्यात यावी, त्यासाठी उपाययोजना करावी, आवश्यकता भासल्यास शॉर्ट टेंडर करून साहित्याची खरेदी करावी, अशा सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिल्यात.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविष्कार खंडाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दि.21 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 व दि.28 एप्रिल 2021 ते दि. 1 मे 2021 या कालावधीत जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. नागरिकांनी हा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळावा, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, शारीरिक अंतर राखावे, मास्कचा वापर करावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले

जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर , वरोरा , राजुरा व मूल या तालुक्याच्या ठिकाणी जंबो सिलेंडर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत आहे. त्यासोबतच जिल्ह्यात 240 बेडचे सिव्हिल हॉस्पिटल सुरू असून 350 बेड वाढविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज जिल्ह्यात 120 बेड कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासोबतच ब्रह्मपुरी येथे 100 बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंदेवाहीतही 50 बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 500 बेड वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयाला रेमडेसिविरचा पुरवठा करीत असतांना जिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या परवानगीने पुरवठा व्हावा. रुग्णाच्या व हॉस्पिटलच्या नावासह रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याची नोंद प्रत्येक रुग्णालयाने जिल्हाधिकारी कार्यालयात करावी, असे निर्देश ना. विजय वडेट्टीवार यांनी दिलेत.

यावेळी खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी सीएसआर फंड मधील निधी कोविड उपाय योजनेसाठी वळविण्यात यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

बाधित रुग्णाला ऑक्सिजनची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होतो. ऑक्सिजनची ही उणीव भरून काढण्यासाठी महिला रुग्णालयामध्ये 20 केएलच्या ऑक्सिजन टॅंक सुरू केलेल्या आहेत. तर 13 केएलच्या ऑक्सिजन टॅंक सिविल हॉस्पिटल मध्ये बसविण्यात आले असून त्या कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन कार्य करीत आहे.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.