राज्याच्या अर्थव्यवस्थेला हाथ देणा-या बळीराजाला साथ देणारा अर्थसंकल्प : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर :
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा व आरोग्य सेवेला बळकटी देणारा अर्थसंकल्प आहे. शेतक-यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेला हाथ देणा-या बळीराजाला साथ देण्यासाठी तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीसाठी २ हजार कोटी, पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी ३७०० कोटी, विकेल ते पिकेल या योजनेसाठी २ हजार १०० कोटी, कृषीपंपाच्या जोडणीसाठी १५०० कोटी तर सिंचनासाठी जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटी, जलंसधारण प्रकल्पांसाठी २ हजार ६० कोटींची तरतूद केली असून गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील जनतेपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पोटतिडकीने काम करीत आहे. या कामी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व शेतकरी, भूमिपुत्र, सामान्य जनतेसाठी उपयुक्त योजनांचा लाभ, लोकाभिमुख सेवा देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला आहे.