महाराष्ट्रात मोठे वसुली वादळ सुरु असताना केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे नेते राज्यभर उपोषण करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य नेते आणि मंत्रीही मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (26 मार्च) रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत उपोषण करणार आहेत. तशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणीही काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषणाला बसणार आहेत. औरंगाबादेत शिवाजीराव मोघे, ठाण्यात माजी मंत्री नसीम खान, नागपुरात चंद्रकांत हांडोरे, पुण्यात बसवराज पाटील, नाशिकमध्ये आमदार प्रणिती शिंदे तर अमरावतीत आमदार कुणाल पाटील हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत.