सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला मोर्चाने कटिबध्द राहावे – सौ. अंजली घोटेकर
भाजपा महिला मोर्चा महानगर शाखेतर्फे सदस्य नोंदणी कार्यक्रम संपन्न
चंद्रपूर : राजमाता जिजाऊ यांनी आपल्या दिव्य संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा घडविला. युगपुरूष स्वामी विवेकानंदांनी बंधूभावाची दिव्य शिकवण देत भारतीय संस्कृतीचा परिचय विश्वाला करून दिला. दिव्य स्वरूपाची भारतीय संस्कृती तिळगुळाच्या माध्यमातुन स्नेहभाव जपत परस्परांमधील स्नेहबंध अधिक दृढ करण्याची शिकवण देणारी जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीचा दिव्य वारसा जपण्याचे काम आम्ही महिला करीत आहोत. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या माध्यमातुन येणा-या काळात जास्तीत जास्त महिलांना पक्षाशी जोडून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन भाजपा महानगर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी केले. सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला मोर्चाने कटिबध्द राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्हा शाखेतर्फे राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि मकरसंक्रांतीचे औचित्य साधुन महिला सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी सौ. अंजली घोटेकर बोलत होत्या. यावेळी महामंत्री सौ. शिला चव्हाण, मनपा सदस्या चंद्रकला सोयाम, प्रभा गुडधे, सुषमा नागोसे, सिंधु राजगुरे, रमीता यादव, लिलावती रविदास, पुनम गरडवा, विनिता मलीक, आरती आगलावे, विजयालक्ष्मी कोटकर, सुनिता चव्हाण, चिंता केवट, ज्योती श्यामलवार, जस्मीन शेख, सरिता चेटुरवार, कविता सरकार आदी महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री सौ. शिला चव्हाण यांनी केले.