पुलगावच्या सभेत आवाहन
पुलगाव, ता. २२ : प्रत्येक निवडणुकीत विरोधक जातीचे राजकारण करतात. जेथे जातीचे राजकारण होते, तेथे चुकीचा उमेदवार निवडला जातो. ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. येथे उमेदवारांची जात न बघता कर्तृत्व बघा, कर्तृत्वाला कौल द्या, असे मार्मिक आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पुलगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर उमेदवार संदीप जोशी, भाजपचे वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, वर्धा जिल्हा परिषद उपाध्यक्षा वैशाली येरावार, नगराध्यक्ष शीतल घाटे, बाबारावजी देशमुख, पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष वरूण पाठक, संजय गाथे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ही निवडणूक सुशिक्षित, उच्चशिक्षितांची आहे. या निवडणुकीसाठी मतदान करणारे मतदारही सुशिक्षित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जातीचा विखारी प्रचार कामात येत नाही. मतदार सूज्ञ आहेत. आपण काय केले हे सांगण्यासाठी विरोधकांजवळ काहीही नाही. ज्यांना यापूर्वीच्या निवडणुकीत मतदारांनी दोनदा नाकारले तेच पुन्हा जनतेसमोर येत आहेत. सत्तेसाठी ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली ते पक्षाशी आणि मतदारांशी कसे प्रामाणिक राहू शकतात, याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक आहे. संदीप जोशी हे राजकारणातील समाजकारणी आहेत. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भक्कम साथ त्यांच्या सोबत आहे. संवेदनशील मनाच्या संदीप जोशी यांनी अनेक समाजपयोगी प्रकल्प उभारले. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूवर मोफत शस्त्रक्रिया केल्या. हा माणूस आपले कर्तृत्व घेऊन रिंगणात उतरला आहे. त्यांच्या कर्तृत्वापुढे जात गौण ठरते. त्यामुळे या निवडणुकीत कर्तृत्वाला मतदान करा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
उमेदवार संदीप जोशी यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. पदवीधर आणि शिक्षक हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्याशी आपली नाळ जुळलेली आहे. प्रश्न आणि समस्या कुठल्याही असो, माझा हेतू प्रामाणिक आहे. मी निवडून आल्यानंतर आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी अन्य प्रमुख वक्त्यांचीही भाषणे झालीत. उपस्थितांनी भाजप- मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना निवडून देण्याचा संकल्प केला.