गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा ९ वा वर्धापनदिन शुक्रवारी (ता.२) आॅनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या सभागृहातून मोठ्या थाटात पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व विद्यापीठ गीताने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून द सेन्ट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी आॅफ आंध्रप्रदेशचे कुलगुरु प्रा. टी. व्ही. कट्टीमनी उपस्थित होते.
याप्रसंगी चंद्रपूरचे मदन धनकर यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉ. पराग पुरुषोत्तम धनकर यांनी स्वीकारले. याप्रसंगी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, संचालक, विद्यापीठाचे अधिकारी व विविध महाविद्यालयांचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, प्राध्यापक विद्यापीठाचे व संलग्नित महाविद्यालयांचे कर्मचारी आणि विद्यार्थी आॅनलाईन उपस्थित होते.
महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंहजी कोशियारी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या ९ व्या वर्धापन दिनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या व गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. गोंडवाना विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संशोधनात्मक कार्य करेल, अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे द सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी आॅफ आंध्रप्रदेशचे कुलगुरू प्रा. टी. वी. कट्टिमनी म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा हे वनव्याप्त असल्यामुळे वनावर प्रकिया करणारे शिक्षण विद्यापीठामध्ये शिकविण्याबाबत तसेच लहान लहान उद्योगाची स्थापना करून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्याबाबत सांगितले. वनौषधी व वनांपासून मिळणारे उत्पादन यावर प्रकिया करून राष्ट्रीय व जागतिक पातळीवर गडचिरोली, चंद्रपूर व गोंडवाना विद्यापीठाचे नावलौकिक करता येईल. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये वनऔषधीवर आधारित प्रकिया उद्योग व त्यांचे व्यवस्थापन असे अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाहेर ठिकाणी जाउनच आपला विकास होईल ही भावना न बाळगता गडचिरोली व चंद्रपूर येथे राहून वनांपासून मिळणाºया उत्पादनावर प्रक्रिया करणाºया लहान लहान उद्योगांची स्थापना करावी व त्यापासून गरजू लोकांना रोजगार निर्मिती करून द्यावे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी जीवन साधना गौरव पुरस्काराव्यतिरीक्त उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आनंद निकेतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरोरा जि. चंद्रपूर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ. सुरेश बाकरे , श्री. ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव, जि. चंद्रपूर, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. नरेंद्र टी. आरेकर, श्री. गोविंदराव मुनघाटे आर्टस अॅड सायंस कॉलेज, कुरखेडा जि. गडचिरोली, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३) श्री. प्रशांत सुर्यभान पुनवटकर, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ४) श्री. गौरव चौधरी, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (संलग्नीत महाविद्यालय) शशांक एस. नामेवार, शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर जि. चंद्रपुर, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (संलग्नीत महाविद्यालये) अनिकेत नामदेव दुर्गे, सुशिला रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर व राजेश बसवेश्वर हजारे, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थींनी पुरस्कार (संलग्नीत महाविद्यालये) कु. रोशनी दीपक नागपुरे, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर व कु. मयुरी सुरेश आत्राम, सुशिला रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. शिल्पा आठवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. श्रीराम कावळे, अधिष्ठाता (मानवविज्ञान विद्याशाखा) यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहूर्ले यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती दिली.