बॉलीवूडची माणसं संवेदनशील. आतापर्यंत संयमाने वागत आले. संकटाच्या काळात धावून अाले. राष्ट्रीय संकटात. कोरोनाच्या महामारीत. नैसर्गिक संकटात. चित्रपट सृष्टी मदतीत आघाडीवर. अनेकदा टीकाटिपणीला समोरा गेली. खुलाशाच्या भानगडीत सहसा नाही. आता खूप झाले. असह्य झाले. तेव्हा ते खवळले. राग व्यक्त करते झाले. न्यायालयाचे दार ठोठावले. रिपब्लिकन टीव्ही, टाईम्स नाऊला आवरा म्हणाले. सुशांतच्या आड बॉलिवूडवर शंभरांवर दिवस हल्ले चालू होते. रोज हल्ले करणारे टीव्ही चँनेल्स. टीव्ही आली. तेव्हापासून तिचे ' छोटा पडदा ' नामकरण झाले. त्यात विविध चँनेल्सची भर पडली. समृध्दी वाढली. या सोबत छोट्या पडद्यावर काहींची मनमानी वाढली. मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्यांना शिव्यांचा प्रसाद देवू लागले. हे सर्व निमूटपणे सहन कसे करणार. सहनशीलतेला मर्यादा असते. संयमाचा अखेर बांध फुटला. अनेक दिवसाचा राग होता. तो उफाळून आला.
अर्नब प्रवृत्तीला आवरा..
त्याला कारणं आहेत. घसरलेली माध्यमं. पत्रकारितेच्या नावावर मुजोरी करणारे. वाटेल तसं वागणारे. वागण्या, बोलण्याची संहिता न पाळणारे. मी हा अहंम जपणारे .त्यात अर्नब गोस्वामी आघाडीवर. त्यांच्या सोबत पिसले जातात. प्रदीप भंडारी, राहूल शिवशंकर, नविका कुमार व अन्य काही. या दोन टीव्ही चॅनेलवर चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा आरोप आहे. गंदा, मैला, ड्रगी, नशाकार या शब्दांनी उध्दार केला. यांचे कार्यक्रम म्हणजे शिव्यांची स्पर्धा. असा भास होतो.बॉलिवूडचा दुर्गंधी असा उल्लेख केला. अरब राष्ट्रातील सर्व अंत्तर आणला. बॉलिवूडवर शिंपडला. तरी दुर्गंधी जाणार नाही. इतकी दुर्गंधी आहे. अशा अनेक अपशब्दांचा वापर केला. असह्य, वेदनादायक शब्द वापरले . या शिव्या असह्य झाल्या. त्याने दु:खी झाले. चित्रपट निर्माते, दिग्गदर्शक , पटकथा लेखक, कलाकार , सहाय्यक आदीं .
याचिका दाखल...
बॉलिवूडवाल्यांनी हायकोर्टात याचिका टाकली. याचिकाकर्त्यांत चित्रपट सृष्टीतील फिल्म निर्माता संघटना, सिनेमा व टीव्ही कलाकार संघटना, पटकथा लेखक संघटना, आमीर खान, अजय देवगण, अनिल कपूर, रोहित शेट्टी,अक्षयकुमार, सलमान खान, आशूतोष गोवारीकर, शाहरूख खान आदी ३० च्यावर कलाकारांच्या निर्माता कंपन्या आहेत. या याचिकेत चित्रपटसृष्टी प्रतिष्ठीत आहे. जूनी आहे. देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार देते. कोट्यवधीचा कर देते. देशाला अभिमान असलेल्या क्षेत्राचा शेलक्या शब्दात उल्लेख करणे. नशाखोर ठरविण्याचा प्रकार दोन चँनेल करीत आहेत. त्याला प्रतिबंध घालावे. मानहानी करणाऱ्या या चँनेल्सवर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार पहिल्यादा घडला.
वादग्रस्त राकेश अस्थाना
नॉरोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)प्रमुख राकेश आस्थाना आहेत. हे आस्थाना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील. सीबीआयमध्ये असताना लांच घेतल्याचा आरोप झाला. तेव्हा तत्कालिन सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांनी कारवाईचा बडगा उचलला. ते हे अस्थाना.वादग्रस्त आहेत. सुशांत राजपूत प्रकरणात ड्रग आलं. त्या तपासाच्या निमित्ताने अस्थाना आले. त्यांनी ड्रग्स विक्रीचा तपास करावयाचा होता. ड्रग व्यवसायावर जरब बसवायास हवी. या व्यवसायाचे समूळ उच्चाटन करावयास हवे. त्यांनी या निमित्ताने ड्रग्स पिणाऱ्यांकडे मोर्चा वळविला. जुनी प्रकरणे काढली. कोणत्या पार्टीत कोणी नशा केली. त्या कलाकारांची यादी केली. त्यांच्यावर नोटिस बजावल्या. रिया चक्रवर्ती पर्यंत ठिक होते. तिचा संबंध सुशांतच्या ड्रग व्यसनाशी तरी होता. तिला अटक झाली. २४ दिवस कारागृहात काढले. न्यायालयाने ती अटक नियमबाह्य ठरविली. तपास अधिकाऱ्यांना सनसनीत चपराक लावली.
कलाकारांची चौकशी
या ड्रग प्रकरणात आघाडीची अभिनेत्री दिपिका पादूकोण, सारा अल्ली खान, श्रध्दा कपूर, रकूलप्रित, सीमोन, करिष्मा प्रकाश यांच्यांवर समन्स बजावले. चौकशीसाठी बोलावले. तीन-तीन तास बयाण नोंदविले. तेव्हा चित्रपट सृष्टीत खळबळ माजली. या तपासाचे वृत्त प्रसारणात पत्रकारितेने खालची पातळी गाठली. अँकर मीडिया ट्रायलवर उतरले. कलाकारांना आणि त्यांच्या व्यवसायाला नाही ती दुषणे देण्यात आली. ही खालची पातळी अनेक न्यूज चँनेल्सनी गाठली होती. चौकशीची दिशा भरकटली होती. त्याचे वृत्त संकलन व प्रसारण करणारे ही भरकटले. आता अमक्याचा नंबर. दिपिकाच्या संवादाच्या कँसेट. रिया, दिपिकाने दिली यादी.असे हवेत तारे तोडण्याचे प्रकार चालू होते. चौकशीला बोलावले की त्याला आरोपी ठरविण्याची धडपड करीत. यातूनच टीआरपी मिळते. हा समज. एनसीबीच्या समोर ड्रग्स पार्ट्या चालतात. तेव्हा गप्प बसावयाचे. आताही धंदा चालू आहे. गोव्यात तर खुलेआम आहे. ते थांबविणार नाही.अन् सुशांतच्या आड चालणाऱ्या राजकारणास हातभार लावावयाचे. त्यासाठी भलते, सलते प्रयोग करावयाचे हे चालणार कसे.
व्यवसायाची प्रतिष्ठा...
प्रत्येकाला त्याचा व्यवसाय प्रतिष्ठेचा व सन्मानाचा वाटतो. त्याची लक्तरे काढली जात होती. त्याने कलाकार, निर्माते, लेखक दु:खी होते. त्यांना हा हिनपणा व्यथित करीत होता. ते सर्व एकत्र आले. दोषी मीडियाला आवरा अशी हाक दिली. पत्रकारितेत कोणी चुकीचं करीत असेल तर त्याचे कान पकडले जाते. प्रिंट मीडियात आजही चालते.पत्रकारावर अंकुश असते. संपादक चुकला. तर मालक कान ओढतो. हा प्रकार इलेक्ट्रानिक्स मीडियात दिसत नाही. या अभावाने अँकरचे फावते. त्यातून संपादक व मालकांवर प्रश्न निर्माण होतात. त्यांनी प्रतिष्ठेकडे दुर्लक्ष केले की टीआरपीच्या नांदात मौन बाळगले. याचा कोणी काय अर्थ काढावयाचा हा ज्यांचा- त्याचा प्रश्न. मात्र जे घडले. ते निषेधार्ह आहे. सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण तपास, वृत्त प्रसारण, मीडिया ट्रायल, तपास संस्था यापैकी कोण कसा चुकला. कुठे चुकला. याचे त्या-त्या स्तरावर अंकेक्षण व्हावे. भविष्यात असे घडू नये. फुकटचा मनस्ताप कोणाला होणार नाही. ही दक्षता घ्यावी लागेल. टीआरपीने पत्रकारितेच्या मूळ आदर्शाला धक्का बसत असेल. तर ते त्यागने आवश्यक आहे.
कान टोचल्यावरचा प्रकार
सुदर्शन टीव्हीत असा प्रकार घडला. त्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. सरकारला सुनावले. अस्तित्वात असलेल्या संस्थांना कर्तव्याची जाणीव करुन दिली. आता हे नवे प्रकरण आले. सामाजिक स्वास्थाच्या दृष्टीने पावले हवीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बॉलिवूडबाबत अभिमान व्यक्त केला. येथे तयार होणारे चित्रपट हॉलिवूडच्या तोंडीचे आहेत. जगात प्रतिष्ठा आहे. यामुळे मुंबईला नवी आेळख मिळाली. मुबंई सांस्कृतिक राजधानी झाली.ती देशाची आर्थिक राजधानी आहे. हे अनेकांना खटकते. ते लोक बॉलिवूड नष्ट करु पाहत आहेत. या शब्दात बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर हल्ला केला. या आड विरोधकांना टोमणे लावले. त्यात कंगना आली. तिची बाजू घेणारे राजकारणी आले. हा झाला राजकारणाचा भाग. मात्र नाहक बॉलिवूडला बदनाम करणारा डाव अयोग्यच. सरसकट धोपाटणे त्याहूनही चुकीचे होय.
-भूपेंद्र गणवीर
............BG...........