जन विकास सेनेचे प्रशासनाला आवाहन
रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. जीवावर उदार होऊन कोविड योध्दे काम करीत असताना त्यांच्यामध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची कमतरता भासत आहे. अशावेळी 'निमा' व होमिओपॅथीच्या डॉक्टरांची सेवा घेण्या बाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असताना मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन मागील 15 दिवसांपासून एकमेकांकडे बोट दाखवून नाहक विलंब करीत असल्याचे लक्षात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आजच्या घडीला एकुण ८७०९ कोरोना बाधित रुग्ण आहेत.त्यापैकी ३५२८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.या रुग्णापैकी १०७५ रुग्ण गृह विलगीकरण उपचार घेत असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या पॅनेलवर ११ डॉक्टर्सची नावे आहेत.म्हणजे सरासरी एक डॉक्टर १०० रुग्णांवर ऑनलाइन उपचार करतो किंवा त्यांना मार्गदर्शन करतो असे समजायला हरकत नाही.याच डॉक्टरांकडे डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल किंवा केअर सेंटर सुद्धा आहेत. त्यांच्या दवाखान्यात बेड उपलब्ध नसतात .एकीकडे दवाखान्यातील ॲडमिट रुग्णांवर उपचार आणि दुसरीकडे १०० रुग्णांना ऑनलाइन उपचार किंवा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात कामाच्या तणावामुळे पॅनल वरील डॉक्टर्सला असे करणे शक्य नाही.याचा अर्थ पॅनेलवरील डॉक्टर स्वतः गृह विलगीकरणातील प्रत्येक रुग्णांना सेवा देऊ शकत नाही.मग रुग्णांनी त्यांना दहा दिवसाच्या होम आयसोलेशन साठी तीन हजार रुपये कशाला मोजायचे ? हा प्रश्न आहे.
गृह विलगीकरणातील रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष थांबले पाहिजे.त्यांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळणे गरजेचे आहे.तसेच कोरोना आपत्तीच्या काळात राजकारण करणे योग्य नाही परंतु शासकीय आरोग्य सेवेत सुधारणा करताना आपत्तीच्या काळात दप्तर दिरंगाई,नियोजनाचा अभाव व वेळकाढूपणा या गोष्टी रुग्णांच्या जीवावर बेतू शकतात हे सुध्दा तेवढेच खरे आहे.
तातडीने निर्णय घेतल्यास डॉक्टर्सची कमतरता भरून निघेल
निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन)चे आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेले चंद्रपूर शहर व जिल्ह्यात एकूण 300 च्या जवळपास डॉक्टर आहेत. तसेच होमिओपॅथीचे सुद्धा शंभरच्यावर डॉक्टर आहेत. यामध्ये काही डॉक्टर शासकीय सेवेत असुन उर्वरित डॉक्टर स्वतःची प्रॅक्टिस करतात किंवा चंद्रपुरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा सुद्धा देतात.'निमा' व जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी कोविड आपत्तीमध्ये सेवा देण्याची तयारी दाखवली.मागील १५-२० दिवसांपासून यावर मनपा व जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र अजून पर्यंत निर्णय झाला नाही.महाराष्ट्रातील मालेगाव व धारावी पॅटर्नमध्ये या डॉक्टरांची सेवा घेण्यात आली .मग चंद्रपूर जिल्ह्यात सेवा घेण्यात काय अडचण आहे ? अनुभवी दायींना प्रशिक्षण देऊन शासन प्रसूतीमध्ये त्यांची सेवा घेऊ शकते. मग आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टरची कोविडमध्ये सेवा घ्यायला काय हरकत आहे ?
त्यामुळे वेगाने निर्णय घेऊन निमा व होमिओपॅथीच्या डॉक्टरांची सेवा घ्यावी असे आवाहन जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केलेले आहे.