चार दिवसाचा जनता कर्फ्यु यशस्वी करण्याचे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांचे आवाहन
संजीव बडोले
प्रतिनिधी, नवेगावबांध.
नवेगावबांध दि. 11 ऑगस्ट:-दिनांक 12 ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी 7.00 वाजेपासून दिनांक 16 ऑगस्ट रोज रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी आज दिनांक 11 ऑगस्टला आदेश निर्गमित केला आहे. येथील पोलिस ठाण्याचे 13 अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. कोरोनाव्हायरस संसर्ग गावात पसरू नये व संसर्गाची साखळी तोडण्यात यश मिळावे, याकरता ही जाहीर सुचना आदेशित केली आहे. हे येथे उल्लेखनीय आहे.
नवेगावबांध तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे दिनांक 11 ऑगस्टला covid-19 च्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत नवेगाव बांध येथील कोरोना दक्षता समितीची बैठक घेऊन, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी ,किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, सलून दुकानदार, फळविक्रेते, मटन, मच्छी, कोंबडी विक्रेते, सरकारमान्य मद्यविक्री विक्रेते, सरकारमान्य धान्य विक्रेते, हॉटेल चालक, सोना विक्रेते व इतर दुकानदार यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे ग्रामपंचायत क्षेत्रात covid-19 कोरोनाव्हायरस संसर्गाची साखळी तोडून, संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात करिता नवेगावबांध येथे दिनांक 12 ऑगस्ट रोज बुधवार ला सायंकाळी 7.00 वाजेपासून पासून 16 ऑगस्ट रविवार च्या मध्यरात्रीपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावानुसार कर्फ्यू काळात शासकीय दवाखाना ,मेडिकल दुकान व दूध विक्रेता तसेच शेतीच्या कामांना परवानगी देण्यात येत आहे. उर्वरित सर्व सेवा, आस्थापना व दुकाने बंद राहतील. तसेच जे व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असतील, त्यांनी मौजा नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन आरोग्याची तपासणी व कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वतःला होम क्वारंटाईन करावे. तसेच नवेगावबांध परिसरातील सर्व नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूची देवाणघेवाण करत असतांना, तोंडाला मास्क ,रुमाल बांधावे तसेच वारंवार त्यांनी सॅनिटायझर चा वापर करावा. असे ग्रामपंचायत नवेगावबांध येथील सर्व नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भाव पसरू नये. याकरिता दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. तसेच नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असा आदेश अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर ,आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शिल्पा सोनाले यांनी आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी काढून जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.