नागपूर शिक्षण समन्वय समितीची मागणी
नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महीन्याच्या एक तारखेला पगार मिळावा असा शासन आदेश असतांना सुध्दा दुसरा आठवडा सुरू होऊनही शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन झाले नाही . त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आर्थिक अडचणीत आल्यामुळे सोमवार १० ऑगस्ट रोजी नागपूर शिक्षण समन्वय समितीच्या वतीने नागपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. शिवलींग पटवे यांची भेट घेऊन पगारासंबधी निवेदन देण्यात आले . माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ . शिवलींग पटवे यांनी वेतन पथक अधीक्षक श्री रविंद्र पाटील व श्री निलेश वाघमारे यांच्यासमक्ष चर्चा घडवून आणली. त्यात वेतन अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कोषागार कार्यालयाने जुलै महिन्याच्या वेतन संदर्भात जे अधिसंख्य पदाबाबत माहिती मागितली व आक्षेप घेतले त्या आक्षेपची पूर्तता सोमवारी वेतन पथक कार्यालय कडून पूर्ण करून देयक मंजुरीसाठी कोषागार कार्यालयात सादर करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे या आठवड्याच्या गुरुवार पर्यंत वेतन करण्याचे प्रयत्न आहे असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. तसेच पुढील महिन्यापासून एक तारखेला वेतन झाले पाहिजे म्हणून समितीच्या प्रतिनिधींनी आग्रह धरून मागणी केली व मार्च महिन्यात झालेली २५ टक्के वेतन कपात याच महिन्यात मिळाली पाहिजे अशी मागणी नागपूर समन्वयन समितीच्या वतीने करण्यात आली. तेव्हा दोन्ही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. उपरोक्त मागण्या पूर्ण न झाल्यास नागपुर शिक्षण समन्वय समिती तीव्र आंदोलन करणार अशी भूमिका समितीनी मांडली. या शिष्टमंडळात मुख्य समन्वयक श्री. अनिल गोतमारे, डॉ. अशोक गव्हाणकर, श्री.पुरुषोत्तम पंचभाई, श्री.दिलीप तडस, श्री.नामा जाधव, श्री.बाळा आगलावे, श्री.सपन नेहरोत्रा , श्नी.विठ्ठल जूनघरे, श्री .अरविंद शेंडे, श्री.गजानन भोरड, श्री.धनराज राऊत, श्री.अभिजित पोटले, श्री.पृथ्वीराज चव्हाण, श्री.विजय काळे प्रामुख्याने उपस्थित होते.