यवतमाळ : जिल्ह्यात काही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवाच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी यंत्रणेचा आढावा घेतला.
नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात मृत्युचा आकडा रोजच वाढत आहे. तसेच यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, केळापूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांनी गांभीर्याने कामे करावी. हा आकडा असाच वाढत राहिला तर तालुकास्तीय समितीत असलेल्या सदस्यांना जाब विचारण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आपल्या तालुक्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी करा. त्यासाठी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. यात कोणतीही हयगय सहन करणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही रुग्ण एकदम वेळेवर भरती झाले. त्यामुळे त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. मात्र जे रुग्ण 12 ते 96 तास या कालावधीत भरती होते, अशाही लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपाचाराची दिशा काय होती. त्यांचा जीव का वाचू शकला नाही, आदी प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली.
लक्षणे असलेले रुग्ण तालुकास्तरावरूनच वेळेच्या आत रेफर केले तर जीव वाचू शकतो. मात्र तालुका आणि ग्रामीण स्तरावर होणा-या सर्व्हेमध्ये असे रुग्ण समितीला आढळून येत नाही. याचाच अर्थ सर्व्हे व्यवस्थित होतो का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व्हे अत्यंत काटेकोरपणे करा. निष्काळजीपणा करू नका. यामुळे स्वत: रुग्ण असलेल्या व्यक्तिला तर धोका आहेच, त्याच्यासोबत इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे काँटॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर द्या, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
आगामी गणेशोत्सवाबाबत पालकमंत्री म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना न करता, घरीच मूर्तीची स्थापना करावी. कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी सर्व भाविकांनी घ्यावी. यावर्षी मूर्तीची स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीवर तसेच गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. ही बाब सर्व भाविकांनी समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच अत्यंत साध्या पध्दतीने हा गणेशोत्सव घरगुती वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, न.प.मुख्याधिकारी, ठाणेदार व नोडल अधिकारी उपस्थित होते.
००००००००