जुन्नर, /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री फंडात सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांचा निधी देऊ केला असून एकोणपन्नास लाख बावीस हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप केल्याची माहिती जुन्नर तालुका सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील सहकारी संस्थांनी करोना विरुद्धच्या लढ्यात सर्वाधिक मदत केल्याचे मेश्राम यांनी सांगितले. याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या मदतकार्याचे विशेष कौतुक केले आहे.
या मदतकार्यात जुन्नर तालुक्यातील ३७ संस्थांनी सहभाग घेतला असून या पुढील काळातही सहकारी संस्थांनी मदतीचा ओघ सुरू ठेवावा, असे आवाहन मेश्राम यांनी केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील गरजू २२०० कुटुंबांना १४ लक्ष ५४ हजार रुपयांचा शिधा देण्यात आल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे यांनी सांगितले आहे. यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गरजू ३८०० कुटुंबांची नावे काढण्यात आली होती. तर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने तीस लाख रुपयांचे सॅनिटायझर तसेच काही ठिकाणी धान्याचे वाटप करण्यात आले.
नारायणगाव येथील विरोबा, अजिंक्यतारा, चंद्रशेखर, श्रीराम, विक्रांत, धर्मवीर संभाजी, वसंतदादा पाटील, शिवस्तुर्ती तसेच बेल्हे येथील श्रीपाद, जयजवान, साईकृपा, साधना, यशवंतराव चव्हाण, बांगरवाडी आदी पतसंस्थांनी या मदतकार्यात सहभाग नोंदविला आहे. तसेच ग्रामीण भागातील पिंपरी पेंढार, पिंपळवंडी, ओतूर, आळे, खोडद, वडगाव कांदळी, वडगाव आनंद, राजुरी, काळवाडी येथील पतसंस्थांनी या संकटकाळात आपले दातृत्व दाखवून दिले आहे.