नागपूर:अरुण कराळे:
कोरोना विषाणूमुळे सध्या संचारबंदी कायम असल्याने हाताला काम नाही,हातावर आणून पानावर खाणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या परिवाराच्या घरात अन्नाचा दाणा नाही,लहान मुले भुकेनी व्याकुळ झाली आहे.कुटुंब प्रमुख हतबल झाले आहेत,काय करावे काही सुचत नाही सर्व मर्यादा संपल्याने राशन कार्ड नसलेली अनेक कुटूंबातील जवळपास ५० -६० महीला उन्हा-तान्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून मदतीसाठी आक्रोश करीत असल्याचे चित्र वाडी शहरात बुधवार २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पहावयास मिळाले आहे.
वाडीतील अनेक सेवाभावी सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी,राजकीय,सामाजिक दानशुर नागरीक धान्य,शिजविलेले अन्न वाटप केले परंतु कुटुंबातील सदस्य संख्या पाहता पुरवठा केलेले धान्य कमी पडत आहे.काम बंद नसल्याने जवळ पैसा नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून नियमित होणारे कार्ड धारकांना राशन वाटले तर केंद्र सरकारने राशन कार्डधारकांना तीन महिन्यांचे मोफत धान्य आणि डाळी मिळतील अशी घोषणा केली.
त्यामुळे राशन दुकानदारांकडे मोफत धान्य वाटप करण्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे.अन्नधान्य वितरण विभागाने मे आणि जून महिन्याचे धान्य १० एप्रिल नंतर देण्यात येईल अशी माहिती येत आहे. वाडी शहरातील विविध भागात २- ३ वर्षांपासून वास्तव्य करीत आहे ज्यांच्याकडे आधार व वोटिंग कार्ड आहे परंतू राशन कार्ड नाही शासनाचे सुचनानुसार कुटुंबातील सदस्यासह स्थानिक प्रशासनाकडे नाव नोंदणी करूनही त्यांना आजूनपर्यंत धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याने आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी महीला रस्त्यावर उतरून आक्रोश करीत आहे. शासनाने विना राशन कार्ड धारकांचा प्रश्न तातडीने निकाली काढून समस्या सोडविण्याची मागणी जोर पकडत आहे.