नागपूर:अरूण कराळे:
कोरोना विषाणूच्या प्रकोपात व कडकडत्या उन्हात पोलिसांना रात्रंदिवस गस्ती घालणे गरजेचे झाले आहे. पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती व आरोग्य चांगले राहावे याकरीता वाडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या उपस्थितीत होमीओपॅथी डॉ. राहूल पाचकवडे,डॉ. स्वेता झाडे, डॉ. सुनिता यादव तसेच परमा सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टचे निशांत झाडे यांच्या तर्फे नि: शुल्क औषधोपचार सेवा मोहिम राबवित आहे. आयूष मंत्रालय यांच्या आदेशानुसार वाडी पोलीस स्टेशन मध्ये ८० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी एक या प्रमाणे ८० होमिओपॅथी औषधीचे वाटप केले.
हे औषध तीन दिवस घ्यायचे असून त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढणार असल्याची माहीती डॉ. स्वेता झाडे यांनी दिली. याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक दिपक पाटील,पोलीस उपनिरीक्षक रेखा संकपाळ ,अमोल लाकडे,अविनाश जायभाये ,संजय गायकवाड ,नितीन पोयाम उपस्थित होते.