Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २६, २०२०

कोरोना आला; मीडिया बदलला...? Corona arrived; Changed media...?





अतिथी संपादक - भूपेंन्द्र गणवीर

कोरोना नव्हता. तेव्हा कोणतीही टी.व्ही.वाहिनी उघडली की पाकिस्थानचे उने-धुणे काढताना दिसत होती. ते शांतपणे नाही, तर तावातावाने. स्टूडिओतील आवाज प्रदुषणाचे भान राहत नसे. बहुतेक अँकर अगदी तोंडफाटे पर्यंत ओरडत.त्यात काही आघाडीवर असावयाचे. पाक, जेएनयू, जामिया या विषयांना धरून रोज चर्चा, वाद रंगत व चघळले जात. ऊब येईपर्यंत तिच ती चर्चा . त्यात पक्ष प्रवक्ता. तो कमी पडतो म्हणून जोडीला संघ प्रवक्ता हमखास राहत असे. देशातील बेकारी, उपासमार कर्जबाजारी, बँक बुडवे, आर्थिक मंदी, वाढत्या शेतकरी आत्महत्या हे विषय कधी तरी लोणच्या सारखे तोंडी लावावयाचे. असे वाटत होते जगाच्या पाठीवर पाक वगळता दुसरा देशच नाही. शिवाय आलटून पालटून तेच तेच विषय .तेच तेच चेहरे. कोणाला आवडो या न आवडो.असा अगदी किळसवाणा प्रकार सर्रास सुरू होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर राहात. तर तेवढ्या पुरता एकादा तो देश. त्या देशातील शहरे, नेते व तेथील  माणसांची चेहरे दिसत होती. 
कोरोनाचे आगमन झाले. तेव्हापासून अँकर पाक विसरले. जेएनयू विसरले. आता असं वाटावयास लागले की पाक हा जगाचा हिस्साच नाही. त्या वाहिन्या, टी.व्ही. त्यांचे अँकर, पँनेलीस्ट, प्रवक्ते पात्रावात्रा , तथाकथित विचारवंत बेपत्ता झाले. पाकच्या सोबतीला  येणारे जेएनयू, जामिया आदी विषय संपले. पाकची चिंता दूरदूर कुठे  दिसत नाही. या कोरोनामुळे जगातील दीड-दोनशे  देश लोकांना कळले.  त्यात असेही काही देश होते. ज्या देशांचे नावही आपला मीडिया कधी उच्चारत नव्हता. त्या देशांतील  चमचमीत रस्ते दिसले. तेथील श्रीमंती दिसली. वैभवता  दिसली.  फँशन बघता आली. राजकारणी दिसले. तेथील एकात्मता अनुभवता आली. डोळे दिपवून टाकणारा विकास दिसला. तेव्हा कळले स्पर्धा करावी तर या देशांसोबत. नाहीतर आपल्या देशातील कर्मदारिंद्री मीडियावाले जग  झाकून ठेवतात.अन् तुच्छ पाकिस्थानचे नाहक तुणतुणे वाजवत बसतात.अशा टी.व्ही.वाहिन्या, काही अँकर व पत्रकारांनाही आता सुधारण्याची वेळ आली. हे कोरोनाने सिध्द झाले. आतापर्यंत पाकचा केवळ बागुलबुवा होता. हे सांगण्यास कोणत्याही ज्याेतिषाची गरज नाही. तसे फक्त भारतातच  आढळणारी ही ज्योतिषांची जात तकलादू व पोटभरू आहे. त्यावर पुन्हा एकदा कोरोनाने शिक्का मोर्तब केला . जातीपंथांच्या मनू निर्मित भिंतीही दिसेनाशा झाल्या. चैन, अनावश्यक उधळपट्टी, कोटीकोटीच्या गाड्या, फुकटची रोषणाई, एसी,भरजरी पोषाक, फुकटचे जलसे, नाचगाणे बंद आहेत. कारण मरण कोणालाच नकोत. प्रत्येकाला जगावयाचे आहे. त्यासाठी हे पथ्थे पाळले जात आहे. हे पथ्थे कायम स्वरूपी  देशवासींयांनी पाळले. तर ती खरी देशभक्ती ठरेल. देशभक्त आणि  देशद्रोही ठरविण्यासाठी  हे निकष असावे. हे निकष अंगिकारले, तर भारत खऱ्या अर्थाने वैभवशाली ठरेल. भारताचे जुने वैभव परत मिळेल. प्रंचड प्रमाणात पेट्रोल-डिझेल वाचेल. कर्जबाजारी सरकार कर्जमुक्त होईल. सरप्लस बजेट सादर करू शकेल. प्रदुषण संपेल. पर्यावरण सुधारेल.कोरोनाचे विषाणू नष्ट होतील. तसेच गरिबी व जातीयेतेचे विषाणू कायमचे नष्ट व्हावेत. त्यासाठी पुन्हा लाँकडाऊन करावे लागले तर करावे. कोरोना पेक्षाही विषारी विषाणू  गरिबी व जातीयेतेचे आहेत. हे वारंवार सांगण्याची गरज न पडो.

लाँकडाऊनने कोरोनाचा पराभव अटळ आहे. मात्र ज्याचे पोट हातावर आहे. त्यांच्यावर भूकबळीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. कुपोषितांना झळ बसण्याची शक्यता आहे.भूकीचे संकट टाळण्यासाठी हजारो अंतराच्या पायपीट सुरू आहेत. कायदे व निर्बंध एकीकडे अन् माणूसकी दुसरीकडे. जीव धोक्यात घालून पायी जाणाऱ्यांना वाहने पुरविले. तर बिघडणार नाही. आवश्यक वस्तू समजून त्यांना मदतीचा हात देणे काळाची गरज आहे. कसे जातील ते हजार-पाचसे किलोमीटर याचा विचार व्हावा. वेडेपणा  म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कुपोषण,उपासमार  टळले तर आपण कमावले. अन्यथा या सगळ्या प्रयत्नांना व उपाययोजनांना गालबोट लागेल.  त्याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी. या कोरोनाने माणूस म्हणूनच माझा सामना करा असेच बजावले. त्यातूनच अंधश्रध्देची दुकाने बंद पडली . सर्वत्र विद़्यान  व माणुसकीच्या प्रयोगशाळा सुरू आहेत. या प्रयोगशाळा आणखी मजबूत व्हाव्यात. अन् त्या कायम टिकाव्यात. तर भारताने कमावले . संकटापासून भारतीय शिकले. शहाणे झाले असे म्हणता येईल. तसेच घडो. ही प्रतीक्षा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.