तालुका प्रतिनिधी/ सिंदेवाही
सिंदेवाही : तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या शिवणी - वासेरा मार्गावरील शेतशिवार व मुख्य मार्गालगत वाघाचे वास्तव्य दिसून येत असल्यामुळे व हिस्त्रप्राणी वाघाचे दर्शन होत असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
शिवणी ते वासेरा मार्गावरील बोळी परिसर शेतशिवारात वाघाचे अस्तीत्व चार - पाच दिवसापांसून आढळून आल्याने भीती निर्माण झाली आहे. याच परिसरात दोन जनावरांना ठार केल्याचीही घटना घडली होती. वारंवार वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण झाले आहे तसेच त्या मुख्य मार्गाने पादचाऱ्यांना भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे अवागमन करणेही कठीण होत आहे.
या परिसरात ३ ते ४ वाघांचा वावर असल्याचे परिसरातील गाववासीयाकडून सांगण्यात येत आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी शिवणी ग्रामपंचायंतीत बैठक सुद्धा घेण्यात आली. कोणतीही मोठी दुर्घटना न घडावी व शेतकऱ्यांना शेतशिवारात बिनदिक्कतपणे जाण्यासाठी वाघाच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करण्यात यावी, यासाठी वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.