विदर्भातील 5 हजार 808 शेतकऱ्यांना वीजपुरवठा
नागपूर/प्रतिनिधी:शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फ़े जाहिर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या संपुर्ण विदर्भात आतापर्यंत सुमारे 5 हजार 808 शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यासाठी तब्बल 3 हजार 17 किमी लांबीची उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यात आली आहे.
मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव संकल्पनेला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या योजनेला गती दिली. त्यानुसार मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या विदर्भातील 42 हजार शेतक-यांसह राज्यातील 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी 2 लाख 50 हजार रूपयांचा अंदाजित खर्च येणार असून यापेक्षा अधिक खर्च येणा-या राज्यातील तब्बल 33 हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
संपुर्ण राज्यात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता 5 हजार 48 कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने 10 व 16 केव्हीएचे सुमारे 1 लाख 30 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला आहे.
राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. या प्रणालीचे कामे जलद व उच्चदर्जाची व्हावीत यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले असून व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे. राज्यात ही योजना फूल-टर्न की व पार्शियल-टर्न की अशा दोन प्रकारे राबविण्यात येत असून विदर्भातील अकराही जिह्यात ही कामे फूल-टर्न की तत्वावर देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये 600 एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह 100 टक्के कामे एजन्सीना देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-2020 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून यात 1 किंवा 2 शेतकऱ्यांसाठी समर्पित रोहित्र राहील. यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या रोहित्राप्रती स्वामित्वाची भावना राहणार असून शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनातही वाढ होईल. लघू व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी या योजने अंतर्गत सिंचनाची उद्दिष्टपूर्ती साधता येईल. तसेच रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन तांत्रिक व वीजहानीचे प्रमाण कमी होणार आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 743, बुलढाणा जिल्ह्यात 716, वाशिम जिल्ह्यात 571, अमरावती जिल्ह्यात 544, यवतमाळ जिल्ह्यात 846, चंद्रपूर जिल्ह्यात 291, गडचिरोली जिल्ह्यात 233, भंडारा जिल्ह्यात 369, गोंदीया जिल्ह्यात 551, नागपूर जिल्ह्यात 688 तर वर्धा जिल्ह्यातील 256 अशा विदर्भातील एकूण 5 हजार 808 शेतक-यांना उच्चदाब वीज जोडणी देण्यात आल्या असून तब्बल 8 हजारावर वितरण रोहीत्रे उभारण्यात आली असून उर्वरीत कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधितांना देण्यात आले आहे.