चंद्रपुर/प्रतिनिधी:
महानिर्मितीने नव्याने एकीकृत ई-निविदा “पुरवठा-संबंध-व्यवस्थापन” हि प्रणाली अंगीकृत केली आहे. अनुकूल खरेदी रणनीती, कंत्राटदार/पुरवठादारांच्या समूहासमवेत दीर्घकालीन संबंध, खरेदी प्रक्रिया सोपी, सुटसुटीत करणे, संपूर्ण खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शी करणे हा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्या मागचा प्राथमिक उद्देश आहे.
कुठल्याही संस्थेच्या विकासात, “पुरवठा-संबंध” याची महत्वाची भूमिका असते. ई-निविदा एस.आर.एम. पद्धती नवी असल्याने सध्यस्थितीत याचा वापर करताना अडचणी निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुरवठादारांच्या ह्या समस्येचे तातडीने निरसन करण्यासाठी महानिर्मिती अंतर्गत नोंदणीकृत राज्यभरातील कंत्राटदार/पुरवठादारांची औष्णिक विद्युत केंद्र निहाय बैठक चंद्रपूर(८ जुलै), खापरखेडा(९ जुलै), कोराडी(१० जुलै), पारस(११ जुलै), भुसावळ(१२ जुलै), नाशिक(१६ जुलै) आणि परळी(१९ जुलै) येथे आयोजित करण्यात येत आहेत. ह्या बाबतचा तपशील महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कंत्राटदार/पुरवठादारांना बैठकीबाबतची माहिती त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एस.एम.एस. व ई-मेलद्वारे देखील पाठविण्यात आलेली आहे.
महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) नितीन चांदुरकर तसेच एस.आर.एम. प्रणालीचे तज्ज्ञ व्यक्ती या बैठकीत मार्गदर्शन करणार असून कंत्राटदार/पुरवठादार यांच्या समस्या जाणून घेणार आहेत व त्या अनुषंगाने समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे.
सोमवार ८ जुलै २०१९ रोजी सकाळी ११ वाजता झेप सभागृह, उर्जाभवन, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे बैठक आयोजित केली असून चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटदार/पुरवठादारांनी सदर बैठकीत सहभागी व्हावे. बैठक समन्वयक म्हणून सुहास जाधव, अधीक्षक अभियंता मोबाईल क्रमांक ८४११९५८७२८ हे कार्यभार सांभाळणार आहेत.
तरी जे कंत्राटदार/पुरवठादार महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, प्रकल्प, स्थापत्य येथे नोंदणीकृत आहेत त्यांनी या बैठकीस आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन राजू घुगे मुख्य अभियंता चंद्रपूर वीज केंद्र यांनी केले आहे.