26 खांब गेले वाहून; 7.5 लाखांचे नुकसान
रत्नागिरी/प्रतिनिधी:
तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण फुटीमध्ये महावितरणचे तब्बल 26 वीज खांब वाहून गेले तर 2 रोहित्र पेट्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी तिवरे येथील भेंदवाडीचा व फणसवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी दोन दिवस युध्दपातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे हा वीजपुरवठा सुरळीत केल्याने भेंदवाडी पुन्हा एकदा प्रकाशमान झाली आहे.
भेंदवाडीला महावितरणच्या गाणेखडपोली येथील वीज उपकेंद्रातून 11 केव्ही तिवरे वाहिनीद्वारे वीजपुरवठा होतो. 2 जुलैच्या रात्री तिवरे धरणाला भगदाड पडून भेंदवाडी उध्दवस्त झाली. यामध्ये उच्च्ादाबाचे 4 व लघुदाबाचे 22 असे 26 वीज खांब तारांसह वाहून गेले. रोहित्र, रोहित्रपेट्या व काही वीज खांब असे एकूण साडेसात लाखांचे नुकसान झाले. खांब वाहून गेल्यामुळे भेंदवाडी व पुढे असलेल्या फणसवाडी येथील एकूण 70 ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. नादुरुस्त झल्याने भेंदवाडी व फणसवाडी वगळता सर्व गावांचा वीजपुरवठा लागलीच पूर्ववत सुरु झाला.
महावितरण कोकण परिमंडलाच्या मुख्य अभियंता सौ. रंजना पगारे, अधीक्षक अभियंता श्री. प्रभाकर पेठकर, चिपळूणचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश जमधडे, उपकार्यकारी अभियंता श्री. सुरेंद्र पालशेतकर यांचेसह पिंपळीचे शाखा अभियंता श्री. दिपक गोंधळेकर व त्यांच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी 3 जुलै रोजी सकाळी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न केले. परंतु, प्रतिकूल वातावरणामुळे काम करता आले नाही. दुसऱ्या दिवशी (4 जुलै) पुन्हा सर्व अधिकारी मंडळी व ठेकेदार मे. प्रकाश इलेक्ट्रील्स यांचे 30 ते 35 कामगार सर्व साहित्यानिशी सकाळी 9 वाजताच भेंदवाडी येथे पोहोचले. पावसाचा अडथळा होताच पण त्याला न जुमानता कामाला सुरूवात केली.
विजेचे खांब उभे करण्यापेक्षा त्याची वाहतूक करणे आव्हानात्मक होते. कारण भेंदवाडीला जाताना नदी ओलांडावी लागत होती. रस्ता नव्हताच. त्यामुळे लोखंडी खांब दहा-बाराजणांनी खांद्यावर घेऊन वाहती नदी ओलांडणे सोपे काम नव्हते. पण इच्छाशक्ती दांडगी असल्याने सामुहिक बळाने अडचणीवर मात केली. दिवसभरात 7 खांब उभे करुन रात्री 9.30 च्या सुमारास 43 ग्राहकांच्या वीज जोडण्या सुरू करण्यात यश आले. शुक्रवारी (दि. 5) आणखी दोन पोल उभे पोल करुन 2 जोडण्या चालू करण्यात आल्या आहेत.
धरणफूटीमुळे 70 वीज जोडण्या बाधीत झाल्या होत्या. यामध्ये दोन पाणीपुरवठा योजनांचाही समावेश आहे. त्यातील एक पाणीपुरवठा येाजना पूर्वीपासूनच बंद होती तर एक मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. याचेही काम केले जाणार आहे. बरीच घरे कायमची उध्दवस्त झाल्याने नामशेष झाली आहेत. त्यामुळे त्यांना वीज जोडणी नेमकी कुठे द्यायची आणि कुणासाठी घ्यायची हा प्रश्न आहे.