Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ०५, २०१९

कॅन्सर हॉस्पिटल एका वर्षात तर वैद्यकीय महाविद्यालय दोन वर्षात पूर्ण होईल:मुनगंटीवार

इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे 'डॉक्टर्स डे 'चे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:


चंद्रपूर जिल्हावासियांच्या सेवेत एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय, तर पुढील दोन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारती येणार आहेत. या परिसरातील गरजू, वंचिताची मोठया प्रमाणात सेवा करण्याची संधी वैद्यकीय व्यवसायिकांना आहे. आज डॉक्टर्स डे साजरा करताना प्रत्येक रुग्णाला उत्तम सेवा देण्यासाठी आपण तत्पर असूया, असे आवाहन  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


डॉक्टर डे ' चे औचित्य साधत, वैद्यकीय व्यवसाय, समाजाची अपेक्षा, डॉक्टरांची अपेक्षा, डॉक्टरांच्या मागणी याबाबत आपले चिंतन मांडताना त्यांनी ज्यांच्या स्मृतीत आज डॉक्टर डे साजरा केला जातो. त्या पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न बी.सी. राय यांचा एका प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख केला...  ते म्हणाले,वैद्यकीय सेवेसाठी माणसाला डॉक्टर्स बनवण्याची स्पर्धा जगामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण डॉक्टरांना माणूस बनवनेही फार आवश्यक आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रोत्साहन देण्याचे कार्य इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे सुरू आहे. असे गौरवोद्गार काढत राज्याचे अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित सर्व डॉक्टरचे अभिनंदन केले.



        स्वतः डॉक्टर असणारे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न बी.सी. राय यांचा जन्मदिवस डॉक्टर्स डे म्हणून देशभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर डे व सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थितांना संबोधित करताना पृथ्वीला कोटयावधी वर्षाचा इतिहास असून सात हजार वर्षापूर्वी मानवाचा जन्म झाला. या पृथ्वीवरील पशुपक्षी निसर्गाला कोणताही त्रास देत नाही. तर मानवानेच यात प्लॉस्टिक सारख्या भस्मासुराला जन्म देत वसुंधरेचे वाटोळं करण्यास सुरुवात केली. यावर नियंत्रण करणे अतीआवश्यक झाले आहे, असे नमूद करत पाडेवार सरांच्या वेस्ट टू बेस्ट प्रात्यक्षिकाचेही त्यांनी कौतुक केले. चंद्रपूरमध्ये वेलनेस सेंटर उभे करणार असून येत्या दोन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण होईल. तसेच कॅन्सर हॉस्पिटलचेही बांधकाम वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


       जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू असून त्यामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधांनी परिपूर्ण असलेली वन अकादमी, आशियातली वैशिष्ट्यपूर्ण इमारत असलेली चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था, बेंगलोरच्या धर्तीवर निर्माण करण्यात येत असलेले बॉटनिकल गार्डन, यांचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. यातून जिल्ह्याला कौशल्य संपन्न करण्यात येत असून 33 कोटी  वृक्षलागवड अभियानाद्वारे वनसंपन्न करण्यास वाटचाल सुरू आहे. वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्याला आरोग्यसंपन्नतेच्या दृष्टीकोनातूनही मॉडल हेल्थ डिस्ट्रिकची निर्मिती करणार आहोत. विकासाच्या दृष्टिकोनातून असलेली जगाची परिभाषा बदलत असून जीडीपी ऐवजी हॅपिनेस इंडेक्सची भाषा युनोने स्वीकारली आहे. म्हणून जिल्ह्याला आनंददायी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


        तत्पूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष किरण देशपांडे यांनी प्रास्ताविक करत डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टर्समध्ये सलोखा निर्माण व्हावा, वैचारिक एकता, प्रामाणिकपणा आणि सेवा भावना रुजावी या माध्यमातून भारतरत्न बी. सी. राय यांना अभिवादन करावे. याकरिता फक्त डॉक्टर डे नाहीतर डॉक्टर विकच आयोजन करून विविध उपक्रम इंडियन मेडिकल मेडिकल असोसिएशन द्वारे राबविण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. या कार्यक्रमादरम्यान कचरा वेचून व विक्री करून जमा केलेले पैसे प्रधानमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करणाऱ्या लहान मुलींचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सर्व डॉक्टरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


       याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. नजित मवानी, शहरातील नामवंत डॉक्टर, नागरीक तसेच  वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.