अॅड महेंद्र गोस्वामी-युवकांच्या विचारसरणीत परिवर्तनाची गरज
भंडारा/मनोज चीचघरे:
परिवर्तन घडविणारा दुसरा-तिसरा कोणी नसून मी स्वतः आहे आणि परिवर्तनाचा लाभ घेणारा सुद्धा मी स्वतःच आहे .चांगले काय आणि वाईट काय हे समजून जो स्वतःला बदलू शकतो तोच परिवर्तन घडवतो. दुस-यावर अवलंबून असणारा कधीही परिवर्तन घडवू शकत नाही , असे विचार जामगांव पहेला पुनर्वसन येथे आयोजित धम्म प्रशिक्षण शिबिरात बोलताना माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी मांडले.
एही पस्सिको अर्थात या आणि बघा व अत्त दिप भव अर्थात स्वयं प्रकाशित व्हा, हे बुद्धाने दिलेले तत्वज्ञान आजच्या युवकांनी आत्मसात करण्याची गरज असून व्यूई कॅन डू इट अर्थात हे मी करू शकतो, असा आत्मविश्वास युवकांनी बाळगावा असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाबोधी उपासक संघ नागपूर व शांतीवन बुद्ध विहार चिचाळ यांनी नुकतेच जामगांव पहेला पुनर्वसन येथे धम्म शिबिराचे आयोजन केले होते. तिथे विचार मांडताना अॅड महेंद्र गोस्वामी यांनी युवकांना ध्यानसाधना व विपश्यना यावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली.
युवकांनी सोशल मिडियाच्या आहारी जावू नये व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मुलमंत्र शिका,संघटित व्हा व संघर्ष करा कायम ध्यानात ठेवून समाजसेवा करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
या धम्म शिबिराच्या यशस्वीततेसाठी लिमचंद बौद्ध, अरूण गोंडाने, गुलाब घोडसे, वतन बौद्ध, ललित मेश्राम, संजय तिरपुडे, राजेश मेश्राम व जिवन बौद्ध यांनी प्रयत्न केले.
या धम्म शिबिराचे आयोजन, संचालन व प्रास्ताविक लिमचंद बौद्ध यांनी केले.