२५ जून पर्यंत समस्या सोडवण्याचे मजीप्राच्या मुख्य अभियंताचे आश्वासन
पाणी समस्या सूटली नाही तर आंबेडकर नगरमधील महिला करणार शुद्धिकरण केंद्र बंद
नागपूर/अरुण कराळे :
वाडीतील काही भागात अंबाझरीच्या पाण्यामुळे पाणी टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहेत .
तर डॉ .आंबेडकरनगरमध्ये पाण्याची भिषण टंचाई सूरूच आहे. अंबाझरीचे पाणी वेणा जलाश्यामार्फत वितरीत होऊन सूद्धा डॉ .आंबेडकरनगरमध्ये पाणी मिळत नसल्यामुळे बुधवार १९ जून रोजी मजीप्रा कार्यालय नागपूर येथे महिलांनी मोर्चाच्या माध्यमातून आक्रोष व्यक्त केला.बसपा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रणय मेश्राम,वाड़ी शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात मजीप्रा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
महिलाचा आक्रोश पाहता मुख्य अभियंता सतीश सुशीर यांनी यावर लगेच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले .आश्वासन न राहता पाणी समस्या सोडली नाही तर वेणा जलशुद्धिकरण केंद्र बंद करण्याचे आव्हान बसपा नगरसेवक प्रणय मेश्राम यांनी केले . पाण्याचा कमी दबाव , अवैधपणे सुरु असलेले टिल्लू पंप,अवैध कनेक्शन मुळे डॉ .आंबेडकर नगरमधील नागरीकांपर्यंत पाणी पोहोचत नाही आहे.यावर कार्यवाही करण्याची मागणी बसपा कार्यकर्तांनी केली.
पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न मजीप्रा मार्फत सूरू आहे.२५ जून पर्यंत आंबेडकर नगर मध्ये पूर्णपणे पाणी पुरवठा होईल असे आश्वासन मुख्य अभियंता सतीश शुशीर यांनी मोर्चाकऱ्यांना केले.अवैध नळ कनेक्शन ची माहितीची यादी अधिकाऱ्यांना मागीतली. तसेच अवैध नळ कनेक्शन धारकांवर कार्यवाही होणार असल्याची माहिती दिली.आंबेडकरनगरचे पाणी परिसरातील व्यापारी चोरी करत असल्याचा आरोप बसपा शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी केला .
मुख्य अभियंता सतीश शुशीर यांनी सांगीतले की ,अंबाझरीच्या पाण्याचा पुरवठा वाडीत भरपूर प्रमाणात सुरु आहे परंतु योग्य नियोजना अभावी मात्र डॉ . आंबेडकर नगर पर्यंत पाणी पोहोचण्यात असफल होत असल्याचे दिसून येते . यावेळी बसपा कार्यकर्ता प्रमोद रामटेके,विकास राहांगडाले, मनिष रामटेके, साहिल खोब्रागडे,सूनंदा मेश्राम सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.