Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २२, २०१९

वाडीतील स्मशानभूमीची दुरावस्था;सौन्दर्यकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात

स्मशानभुमी लाकडी टालच्या विळख्यात सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य
लाकडी टाल वाल्याचा शासकीय जागेवर कब्जा 
शहरात एकच खाजगी शववाहिनी 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

वाडी शहराचे नगर परिषदेत रूपांतर होऊन जवळपास तीन वर्षे पूर्ण होऊनही शहर अनेक मुलभूत गरजापासून वंचित असल्याने शहराचा विकासाबाबत विचार केल्यास स्थानिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

अनेक समस्यांचे निराकरण झाले असल्याचे प्रशासन कितीही कांगावा करून सांगत असले तरीही स्थानिकांच्या प्रतिक्रियेतून शहरात प्रामुख्याने भीषण पाणी टंचाई,अंतर्गतअतिक्रमण आणि घाणीचे साम्राज्य या समस्या शहरवासीयांना भेडसावत आहे.

     वाडी शहराची २५ वॉर्डात विभागणी झाली असून एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या शहरात मृतात्म्याची अंत्यसंस्कार प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी आंबेडकर नगर व टेकडी वाडी येथे ग्राम पंचायत प्रशासन काळापासून स्मशान घाटाची निर्मिती करण्यात आली आहे .

या स्मशान भूमीची देखभाल पर्यायाने नगर परिषद प्रशासनाची असतांना कोणत्याही प्रकारची ठोस सुधारणा केली गेली नसल्याने स्थानिक प्रशासनावर नागरीक नाराज आहे.तातडीची व्यवस्था म्हणून नगर परिषदेने सामान्य फंडातून टेकडी वाडी येथील स्मशान घाटातील ओट्याचे टिनाचे शेड व संरक्षण भिंत या व्यतिरिक्त कोणतेही काम येथे झालेले नाही .

शहरातील मृतात्म्याला दूर अंतरावरून घाटापर्यंत आणण्याकरिता स्थानिक यंग स्टार क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व लोककल्याण पत संस्था मार्फत माजी सभापती नारायणराव थोराने पाटील  यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक शववाहिनी अगदी अल्पशा दरात आपली सेवा देत आहे .आर्थिक बाजू मजबूत असलेल्या नगर परिषदेने आजपर्यंत शववाहिनी खरेदी केली गेली नाही ही एक शोकांतिकाच म्हणावे लागेल .

समाजात राजकीय टेंभा मिळविणाऱ्या नेत्यांना अशा गोष्टींचा विसरच कसा पडतो.अंत्यसंस्काराला उपस्थित राहून शोकसभेत बोलताना या राजकीय नेत्यांना या त्रुटया कशा लक्षात येत नाही काय?नगर परिषद प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी सौदर्यीकरनासाठी तीन कोटींचा प्रस्ताव पाठविला परंतु अजूनही शासन दरबारी तो धूळ खात पडला आहे.येथिल शौच्छालयाचे दारे,खिडक्या तुटल्या असून नगर परिषदने स्वच्छ शौच्छालयाचा बोर्ड लावून आपल्या कामाचा खोटा प्रचार करतांना मागे-पुढे पाहिले नाही.आजुबाजुला सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . 

स्मशान भूमी परिसराची नियमित साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याची ढिगारे व झाडे-झुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाढली आहे .परिसरातील रहिवाशांना याच नाहक त्रास भोगावा लागतो.संपूर्ण परिसराला संरक्षण भिंत घातली असली तरी एका जागेतुन आत शिरण्यासाठी मोकळी जागा असल्याने आतमध्ये बकऱ्या,डुकरे व मोकाट कुत्र्यांचा नेहमी वावर असतो .याकडे नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असते.नियुक्त कर्मचारीही आपल्या आईच्या नावावर येथे काम करतो असाही अफलातून प्रकार पुढे आला असून दहन प्रमानपत्रावरही संबंधित व्यक्ती सह्या करतो.यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

 स्मशान भूमीच्या परिसरात शासकीय जागेवर अंदाजे २००१  पासून  टाल विक्रेत्याने  लाकडाचा  टाल लावून आपले बस्तान मांडले आहे .स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने एका रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्याच्यावर चौकीदाराची जबाबदारी तसेच दहन विधी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी दिली असतांना दहनविधी प्रमाणपत्र बुक स्वतः टाल मालकाकडे असून त्याला कोणताही अधिकार नसताना स्वतःची सही करून तो दहनविधी प्रमाणपत्र वाटत असल्याचा प्रकारही येथे कित्येक वर्षांपासून घडत आहे .

प्रतिक्रिया
स्मशान भूमीच्या सौदर्यीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी ३ कोटींचा प्रस्ताव पाठविला असून यांमध्ये सभागृह,दहनघाट,शौच्छालय,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,अंतर्गत रस्ते,स्मशान भूमी परिसरातील सुशोभीतीकरण आदी गोष्टीचा समावेश असून प्रस्तावाला मंजुर होऊन निधी मिळताच कामाला सुरुवात करण्यात येईल  राजेश भगत, मुख्याधिकारी,नगर परिषद वाडी


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.