चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्व. प्रकाश ढेरे चॅरीटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळ पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा आणि मराठी साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार चंद्रपूरचे कवी इरफान शेख यांच्या माझ्यातला कवी मरत चाललाय या चर्चित कवितासंग्रहाला जाहीर झालेला आहे.
त्रिसदस्यीय निवड समितीने ही घोषणा काल पुणे येथे केली असून मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण असा हा पुरस्कार समजल्या जातो. रोख रक्कम ११००१/- रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार पद्मश्री दया पवार, विठ्ठल वाघ, प्रशांत मोरे, अजय कांडर, भरत दौंडकर, कल्पना दुधाळ, ऐश्वर्य पाटेकर, वीरा राठोड यांच्यासह अन्य नामवंत कवींना प्रदान करण्यात आलेला आहे. मंगळवार दिनांक 12 मार्च ला महाराष्ट्राच्या नामवंत कवींच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात इरफान शेख याना तो प्रदान केल्या जाईल.
इरफान शेख यांच्या रूपाने हा पुरस्कार चंद्रपूरला प्राप्त झाला हे चंद्रपूरच्या साहित्यक्षेत्रासाठी आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आणि आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यातला कवी मरत चाललाय या कवितासंग्रहाला मिळालेला हा प्रतिष्ठेचा असा सातवा पुरस्कार आहे. पुरस्काराचे हे 33 वे वर्ष आहे. इरफान शेख यांचा माझ्यातला कवी मरत चाललाय हा कवितासंग्रह ऑगस्ट महिन्यात पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाला साहित्ययात्री पुरस्कार, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य महामंडळाचा पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार, साहित्यिकणा फाउंडेशनचा पुरस्कार, कविश्रेष्ठ वाचनालयाचा नारायण सुर्वे पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
महत्वाचे म्हणजे इरफान शेख यांनी आपल्या कवितासंग्रहाच्या माध्यमाने हे प्रतिष्ठित पुरस्कार चंद्रपूरला मिळवून दिले आहे. या कवितासंग्रहाचा पहिली आवृत्ती अल्पावधीतच संपत आलेली असून महाराष्ट्रातल्या नामवंत कवींनी आणि समीक्षकांनी या कवितासंग्रहावर लेखन केलेले आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ किशोर सानप यांनी या कविता संग्रहाला प्रदीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे.जुलै च्या आसपास या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद प्रकाशित होत आहे. इरफान शेख यांची तोरण ही कविता गोंडवाना विद्यापीठात बी ए द्वितीय वर्षात तृतीय सत्रात अभ्यासक्रमात असून मराठीतल्या नामवंत दिवाळी अंकात आणि नियतकालिकात इरफान शेख सातत्याने कविता लेखन करतात. सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या साहित्यविषयक लोक चळवळीचे ते अध्यक्ष असून विदर्भ साहित्य संघाच्या गोंडवन शाखेचे सचिव आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनासह अन्य मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी असणारे इरफान शेख यांची प्रदीर्घ मुलाखत नुकतीच मुंबई येथील रामप्रहर दैनिकाने प्रकाशित केली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी त्यांचे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.