Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

महावितरण:विदर्भातील 2.48 लाख घरकुलांना लाभले प्रकाशाचे सौभाग्य

प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ चे उद्दीष्ट साध्य
नागपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच “सौभाग्य” योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच 2 लाख 48 हजार 870 घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक 42 हजार 713 वीज जोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल 35 हजार 792 वीज जोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्हयात देण्यात आल्या आहेत.


2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे विदर्भात एकूण 57 लाख 19 हजार 382 घरकुले होती, त्यापैकी 10 ऑक्टोबर 2017 पर्यंत 54 लाख 87 हजार 633 घरकुलांचे विद्युतीकरण पुर्ण झाले होते तर 2 लाख 31 हजार 749 घरकुले वीजेपासून वंचित होती. वीजेपासून वंचित नागरिकांना 24 तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना "सौभाग्य" या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ 25 सप्टेंबर 2017 रोजी दिल्ली येथे केला होता तर महाराष्ट्रात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ 23 डिसेंबर 2017 रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक तथा जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंग, राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.

या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने 31 डिसेंबर 2018 पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने वीजेपासून वंचित असलेल्या विदर्भातील सर्वच 2 लाख 31 हजार 749 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येऊन त्यापुढे जात ‘सौभाग्य रथ’ मोहीमे अंतर्गत महावितरणने फ़ेब्रुवारी 2019 च्या अखेरपर्यंत 17 हजार 121 नवीन घरकुलांना वीज जोडणी दिल्याने या योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा 2 लाख 48 हजार 870 पर्यंत नेत 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.

 या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामिण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी दिल्या गेल्याने रोजगारांच्या संधीत वाढ होऊन स्त्रियांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणांचे नवीन दालन उघडले आहे..

सौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात आले. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून 10 टप्प्यात वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला.

 तसेच ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंह यांच्या निर्देशानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने सौभाग्य योजनेत 100 टक्के वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.