ग्राहकांचे व्यवहार सुरळीत रवींद्र अंगावार यांचे स्पष्टीकरण
चंद्रपूर : मुदतीनंतरही शेकडो ग्राहकांचे आणि गुंतवणूकदारांचे पैसे श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांकडून देण्यास टाळाटाळ केला जात असल्याचा आरोप मनसेचे राजू कुकडे आणि काही दैनंदिन ठेव अभिकर्त्यांनी केला होता. मात्र, कोणत्याही ग्राहकांचे पैसे पतसंस्थेकडे थकीत नाही. ग्राहकांचा व्यवहार सुरळीत असून, एका अभिकर्त्याने मनेसेचे राजू कुकडे यांना हाताशी पकडून पतसंस्थेची बदनामी करण्यासाठी ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्टीकरण बॅंकेचे अध्यक्ष रवींद्र अंगावार यांनी सोमवारी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत दिले..
ग्राहकांचे पैसे देणे नियमित सुरू. पतसंस्थेविषयी कोणत्याही ग्राहकांची, गुंतवणूकदारांची तक्रार नाही. मात्र, एका दैनंदिन ठेव अभिकर्त्याने दैनिक ठेविच्या मागील काही दिवसांपासूनच्या रकमा बॅंकेत जमा केल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे या रकमेबाबत विचारणा केल्यानंतर स्वतचे पितळे उघडे पडण्याच्या भीतीने या अभिकर्त्याने राजू कुकडेच्या माध्यमातून पत्रपरिषद घेत बॅंकेची बदनामी करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पतसंस्थेतील सर्व ग्राहक आणि गुंतणूकदारांचे पैसे सुरक्षित असून, वेळवर त्यांच्या रकमा मिळत आहेत. कोणत्याही ग्राहकांचे पैसे पतसंस्थेत थकीत राहणार नाही, ग्राहकांनी यासाठी आश्वस्त राहावे, असे आवाहनही अंगावार यांनी केली. दरम्यान, संस्थेची नाहक बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत विहीरघरे उपस्थित होते..