3 मार्च रोजी संतांच्या वंशजांच्या शुभहस्ते भूमिपूजन
महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना निमंत्रण
मंत्री, दिवाकर रावते यांची माहिती
मुंबई, दि. 27 : श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, या हेतूने एस.टी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत अशा यात्री निवास व बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प.रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते रविवार दि.3 मार्च रोजी पंढरपूर येथील चंद्रभागानगर येथे होणार असल्याची माहिती मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
33 कोटी रुपये निधी
33 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत यात्री निवास व सुसज्ज अशा बसस्थानकाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्यातील 355 तालूक्यातून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधीची बैठक मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात घेण्यात आली. त्यावेळी बोलताना श्री. रावते म्हणाले, "समर्पणाचा संस्कार शिकविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या साक्षीने विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वसामान्य भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या यात्रीनिवास व बसस्थानकाचे भूमिपूजन संतांच्या वंशजांच्या शुभहस्ते व्हावे, हा माऊलीचा आदेश होता. आम्ही शासनकर्ते निमित्तमात्र आहोत."
पांडूरंगाचे दर्शन घेण्याचे आस लागलेल्या प्रत्येक सामान्यजनाला त्याच्या घरापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणारी व पांडूरंगाचे दर्शन घडवून सुखरुप घरी आणणारी "विठाई" ही बस आपल्या सेवेत रुजू झाली आहे. यात्री निवासाच्या निर्मितीमुळे यात्रा व वारीच्या काळामध्ये एस.टी. च्या चालक वाहकांची गैरसोय दूर होईलच तथापि, यात्रा व वारी व्यतिरीक्त इतर दिवशी सर्वसामान्य भाविक प्रवाशांना हक्काच्या निवासाची सोय होणार आहे. यानिमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचे भाग्य एसटीला लाभेल.
या कार्यक्रमाला राज्यभरातील वारकरी साहित्य परिषदेचे 500 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठलकाका पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले, ह.भ.प. नामदेव महाराज शिवणीकर यांनी आभार मानले.