महापौर नंदा जिचकार : परिक्षकांचा केला सत्कार
नागपूर, ता.२७ : माझे शहर कसे असावे, ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजायला हवी. यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ उपक्रमाचे योगदान नक्कीच मोठे आहे. सत्तेचा वापर समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी व्हायला हवे. ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ त्याचे उत्तम उदाहरण आहे. ही प्रक्रिया समारंभापुरती मर्यादित राहणार नाही तर यामाध्यमातून आलेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रत्यक्ष कशी करता येईल, यावर पुढील कार्य सुरू राहील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ अंतर्गत १ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ‘हॅकथॉन’च्या माध्यमातून नागपूर शहरासाठी सुमारे ७५० इनोव्हेटिव्ह आयडियाज् स्पर्धकांनी सादर केल्यात. यापैकी १०० उत्कृष्ट आयडियाज् निवडण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या परिक्षकांशी संवाद आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, निगम सचिव हरिश दुबे, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत कडू, केतन मोहितकर यावेळी उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, मनपा सेवा देणारी संस्था आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशा देता येतील, त्यात नवीन काही करता येईल का, हे लोकसहभागातून कळण्यासाठी ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ची संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणावर आलेल्या आयडियाज्चे परिक्षण करणाऱ्या परिक्षकांनीही यात नोंदविलेला सहभाग वाखाणण्याजोगा होता. या संपूर्ण प्रकल्पात परिक्षकांनी यापुढेही जुळून राहावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.
मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत कडू यांनी यावेळी हॅकॉथॉन, ३ मार्च रोजी आयोजित ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’ समारंभ, परिक्षकांसोबत महापौरांचा संवाद याबाबतची भूमिका मांडली. हॅकॉथॉननंतर घेण्यात आलेले कार्यक्रम आणि पुढे होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अवॉर्डसाठी निवडण्यात आलेल्या १०० प्रकल्पांचे सादरीकरणही केले. यावेळी परिक्षकांनीही त्यांचे अनुभव यावेळी कथन केले. नागपूरमध्ये विद्वत्तेला कमी नाही. त्यासाठी व्यासपीठ मिळणे गरजेचे होते. महापौर इनोव्हेशन अवॉर्डच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ मिळाले. यामाध्यमातून शहरात होणाऱ्या बदलाचे आम्हीही भागीदार आहोत, याचा आम्हाला आनंद असल्याची भावना व्यक्त करतानाच स्पर्धकांनी मांडलेल्या कल्पनांची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी आशाही व्यक्त केली.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी सर्व परिक्षकांचा मनपाचा दुपट्टा, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोपटे देऊन सन्मान केला. सत्कारमूर्तींमध्ये स्थापत्य विभागप्रमुख मो. गुलफाम पठाण, प्रा. किशोर रेवतकर, सहायक प्राध्यापक सर्वश्री रवींद्र जोगेकर, डॉ. श्रीकांत टेकाडे, रवींद्र बुटे, मोहन पिदूरकर, योगेश चिंतावार, डॉ. राजश्री राऊत, संचालक हेमंत गायकवाड यांचा समावेश होता.
३ मार्च रोजी अवॉर्ड समारंभ; महापौरांनी घेतला तयारीचा आढावा
महापौर इनोव्हेशन अवॉर्ड समारंभ रविवार, ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या सोहळ्यात हॅकॉथॉनच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या १०० आयडियाज्ला सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी (ता. २७) महापौर कक्षात घेतला. बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा, राजू भिवगडे, विजय हुमने, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत कडू, केतन मोहितकर उपस्थित होते.