Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २५, २०१९

पालघरमध्ये भूकंपरोधक बांधकामांवर भर द्यावा


भूकंपामुळे होणारी हानी टाळण्यासाठी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 25 : पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सर्व त्या उपाययोजना करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्क्यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक बांधकामांवर भर द्यावा. तसेच या आपत्तीला तोंड देण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच भूकंपाच्या घटनांवर लक्ष ठेवून योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थानची (एनजीआरआय) नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालघरमध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर विविध तज्ज्ञांची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. त्या बैठकीच्‌या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह विविध अधिकारी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. या बैठकीत भूकंप प्रवण क्षेत्र असलेल्या पालघर जिल्ह्यात काय उपाय योजना राबविण्यात याव्यात, यावर या अधिकारी व या विषयातील तज्ज्ञांची चर्चा झाली. तसेच यावेळी विविध उपाय योजनांवर व एनजीआरआय व हवामान खात्याच्या सूचनांवर चर्चा झाली.

पालघरमधील भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबईचे प्रा. रवी सिन्हा यांची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, आयआयटी मुंबईचे प्रा. अलोक गोयल, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे संचालक व्ही. के. गेहलोत, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. व्ही. व्ही. भोसेकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, भूकंपशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनागेश डी. आदींचा समावेश आहे.

पालघरमधील भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी एनजीआरआय व भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात भूकंप सूचना यंत्र (सिस्मोग्राफ) बसविले आहेत. याद्वारे जिल्ह्यात घडणाऱ्या भूकंपविषयक घडामोडींची नोंद ठेवण्यात येत आहे. अलिकडे झालेल्या भूकंपाच्या घटनांची नोंद घेऊन एनजीआरआयने काढलेले निष्कर्ष बैठकीत मांडण्यात आले. त्यानुसार, या परिसरात घडणाऱ्या भूकंपांच्या घटना या गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून घडलेल्या घटनांची पाच विविध यंत्राद्वारे नोंद घेतली असून त्यामध्ये असे आढळून आले आहे की, गेल्या 15 दिवसांमध्ये 600 सूक्ष्म भूकंप झाले असून त्यातील 3.9 रिश्टर स्केलचा धक्का हा सर्वात मोठा सूक्ष्म भूकंपाचा धक्का होता. भूकंपाने पालघर परिसरातील 22 वर्ग कि.मी.चे क्षेत्र प्रभावित झाले असून 15 किमीचा पट्टा याच्या प्रभावाखाली आला होता. या सर्व नैसर्गिक घटना असल्याचेही या नोंदीत दिसून आले आहे.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इमारतींच्या सरचनांमध्ये बदल करण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भूकंप रोधक इमारतींच्या बांधकामांवर भर देण्याचे निर्देश देऊन त्यासाठी जिल्ह्यातील वास्तूविशारद, बांधकाम व्यावसायिक यांची बैठक घेऊन त्यांना त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यास सांगण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, असेही त्यांनी सांगितले.

या क्षेत्रातील भूकंपविषयक घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सूर्या आणि भातसा धरणाच्या ठिकाणी प्रत्येकी 5 त्वरणमापी (एक्सीलरोमीटर) जलसंपदा विभागाने बसवावेत. तसेच या दोन्ही धरणांची संरचनात्मक अखंडता भूकंपातही व्यवस्थित रहावी, यासाठी विशेष व्यवस्था करावी. जिल्हा व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल परीक्षण करावे आणि ज्या इमारती कमकुवत आहेत, त्यांचे पुर्ननिर्माण करावे करावे. या भागातील सर्व इमारतींच्या संरचनात्मक परिक्षण व मुल्यांकनासाठी आयआयटीने सर्वसमावेश मानक तयार करून द्यावे आणि राज्य शासनाने त्या मानकांचा वापर करून सर्व जिल्ह्यांतील इमारतींच्या मुल्यांकनासाठी वापरली जाऊ शकेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी घाबरून न जाता, काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण जनतेला देण्यात यावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठीचे प्रचार व प्रसिद्धी साहित्य एनजीआरआयने तयार केले असून त्याचा वापर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हवामान खाते व एनजीआरआयने पालघरमधील भूकंपाच्या घटनांची नोंद घेऊन त्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षास नियमितपणे द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. पालघर जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या संरचनात्मक बाधकामांचे पुनरावलोकन करावे, अशी विनंती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वनजिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) (रस्ते) सी. पी. जोशी, केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राचे रिझवान अली, शास्त्रज्ञ सचिव कुपट, राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अतुल देऊळगावकर,पालघरचे प्रकल्प संचालक एम. व्ही. दिवे, विवेकानंद कदम, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाण्याचे अधीक्षक अभियंता आर.टी पाटील यांच्यासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई, नॅशनल जियोफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद, भारतीय हवामान विभाग, जलसंपदा विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि पालघर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.