Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी २७, २०१९

चंद्रपूरची पत्रकारिता महाराष्ट्राला प्रेरणादायी असावी : सुधीर मुनगंटीवार

२ कोटीच्या अद्यावत पत्रकार भवनाचे भूमिपूजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 दर्पणकारांच्या भाषेत पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. लोकशाही पत्रकाराशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकशाहीचे सर्व स्तंभ सशक्त असावेत यासाठी जिल्ह्यातल्या सर्व पत्रकार संघाच्या इमारतींना मदत केली जात आहे.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची इमारत देखील महाराष्ट्रातील एक देखणी इमारत होईल, तथापि या ठिकाणावरून प्रेरणादायी पत्रकारितेचा आदर्श निर्माण व्हावा , राज्याच्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात चंद्रपूरचा एक तरी पत्रकार असावा, अशी अपेक्षा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.पत्रकार संघाच्या इमारतीच्या भूमिपूजनाला उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

          चंद्रपूर येथील वरोरा नाका या ठिकाणी असणाऱ्या ३५ वर्ष जुन्या श्रमिक पत्रकार संघाला नवीन वास्तू मिळत आहे. २ कोटीची चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची इमारत पुढच्या १५ ऑगस्टपर्यंत तयार होणार आहे. यामध्ये पत्रकारांना आवश्यक असणाऱ्या ग्रंथालय, संगणक कक्ष व अन्य आधुनिक सुविधांचा समावेश आहे. 

          पत्रकार संघाच्या या भूमिपूजन कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे,जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राखी कांचर्लवार यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघनेश्वर,माजी अध्यक्ष प्रमोद काकडे उपस्थित होते. 

        लोकशाहीच्या चारही स्तंभाला बळकट करण्याचे आपले धोरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यातील न्यायालये, प्रशासकीय भवन, यासोबतच पत्रकार संघाचे कार्यालय देखील आधुनिक असावे याकडे आपला कटाक्ष आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पत्रकार संघाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या इमारती तसेच तालुकास्तरावर पत्रकारांच्या मागणीनुसार पत्रकार भवनाची निर्मिती केली जात आहे. या ठिकाणी उत्तम संदर्भ ग्रंथ , संगणकीय व्यवस्था, इंटरनेट कनेक्टीव्हीटी राहावी याबाबतही आपण लक्ष दिले आहे.

       राज्यस्तरावर पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाच्या मागणीपासून तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये वाढीव डिपॉझिट जमा करण्यापर्यंत अर्थ मंत्री म्हणून अतिशय सकारात्मक पाऊल उचलले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा पत्रकार जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदत झाली पाहिजे असे आपले एक राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक मत आहे. त्यामुळे पत्रकारांनी पेन्शन योजनेसाठी अतिशय कमी पैशांची मागणी केली असतानाही आपण १५ कोटी  रुपयांची तरतूद केली. यामध्ये अधिक वाढ हवी असल्यास आपल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात माझी भेट घ्यायला सांगावे, शक्य ती मदत करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

     पत्रकारांच्या संदर्भातील सर्व योजनांचा लाभ जिल्हास्तरावरही मिळावा याबाबत आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, सोयी चंद्रपूरमध्ये मिळाव्यात याबाबत आपला कटाक्ष आहे. चंद्रपूरचा पत्रकार ज्ञानसंपन्न, टेक्नोसॅव्ही, अनुभवी, सकारात्मक दृष्टी बाळगणारा असावा. सोबतच राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये चंद्रपूरचा कायम सहभाग असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परवा सह्याद्रीवर चंद्रपूरच्या पत्रकाराने राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला तेव्हा आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.

       चंद्रपूरचे निर्माणाधीन पत्रकार भवन हे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या बाजुलाच आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या सर्व रस्त्यांचे व चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. त्यामुळे या इमारतीला आणखी झळाळी येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले . पुढील १५ ऑगस्टपर्यंत ही इमारत तयार व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.

        केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी देखील यावेळी पत्रकारांना संबोधित केले. प्रजासत्ताक दिनाला एका चांगल्या कामाचे भूमिपूजन या ठिकाणी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असून प्रजासत्ताक दिनाला या लेखणीच्या उपासकांसाठी एक अद्यावत भवन निर्माण करीत असल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 यांचे अभिनंदन केले. पत्रकारांनी समर्पित भावनेने या व्यवसायात कार्य करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

     आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. चंद्रपूर मधील पत्रकारितेने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या इमारतीतून उत्तम पद्धतीचे लेखन व्हावे, त्यामध्ये भर पडावी,अशी इच्छा व्यक्त केली

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे भवन साकारत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या निवृत्ती योजनेमध्ये मोठ्या संख्येने राज्य शासनाने भरीव रक्कम ठेवावी व त्याची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

     या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार किशोरभाऊ पोतणवार ,श्रीधर बल्की, मोहन रायपुरे, बंडूभाऊ लडके आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पंकज मोहरील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.