Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १५, २०१९

शेतकऱ्यांसाठी महावितरणचे स्वतंत्र पोर्टल

नागपूर/प्रतिनिधी:

राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचे शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हीडीओ उपलब्ध असणार आहेत. तसेच या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.

या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपारिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता ईलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईल,असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेसी, ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, मराविम सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.