महापौर नंदा जिचकार यांचे नगरसेवकांना आवाहन : ‘महापौर आपल्या दारी’ जाहीर उपक्रम
नागपूर, ता. २० : प्रभागातील सर्व समस्या नागरिकांकडून स्वत: ऐकणे आणि त्यावर तातडीने अंमल करण्याचे निर्देश देणे. शासनाशी संबंधित समस्या पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबारात मांडण्यास नागरिकांना प्रवृत्त करणे आणि नागरिकांचे समाधान करणे, हा महापौर आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम पूर्वघोषित असून त्याची प्रसिद्धीही करण्यात आली आहे. सहायक आयुक्तांनी संबंधित नगरसेवकांना पत्रही दिले आहे. असे असतानाही दौऱ्याबाबत माहिती नसल्याचे आरोप नगरसेवकांनी करणे म्हणजे विकासकार्यात बाधा आणण्यासारखे आहे. नगरसेवकांनी दौऱ्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा समस्यांशी अवगत करुन त्या सोडविण्यावर भर द्यावा आणि विकास कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. १९) महापौर नंदा जिचकार यांनी सतरंजीपुरा झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक ५, २० व २१ मधील वस्त्यांचा दौरा केला आणि नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या स्वच्छता आणि इतर किरकोळ समस्यांसंदर्भात महापौरांनी तेथेच अधिकाऱ्यांना निर्देश देत त्याचे तातडीने निरसन करण्यास सांगितले. मात्र, या दौऱ्याची माहिती नसल्याचा आरोप झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील काही नगरसेवकांनी केला. यावर बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले की, महापौर आपल्या दारी उपकमाची सर्वच माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली आहे. नगरसेवकांनाही सहायक आयुक्तांच्या माध्यमातून पत्र गेले आहेत जेणेकरून नगरसेवकांनी नागरिकांनाही याबाबत माहिती द्यावी. झोनमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठीच हा उपक्रम आहे. अशा उपक्रमांवर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी म्हणजे संबंधित नगरसेवक स्वत: नागरिकांना सामोरे जाण्यास घाबरत असल्याचे द्योतक आहे, असे महापौर नंदा जिचकार यांनी म्हटले आहे.
महानगरपालिका प्रत्येक प्रभागात नागरिकांसाठी सोयी-सुविधा करते. सौंदर्यीकरण करते. या सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी आणि सौंदर्यीकरण अबाधित राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य नगरसेवकांनी करायला हवे, असेही महापौर नंदा जिचकार यांनी म्हटले आहे. विकास कार्यात अडथळा बनण्यापेक्षा पक्षद्वेष आणि व्यक्तीद्वेष बाजूला सारून सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहराच्या विकासकार्यात सहभागी व्हावे, असे भावनिक आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.