Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०८, २०१८

नवी ऊर्जा, व्यक्तिगत संबंध व कलागुणांना फुलविणारा उपक्रम म्हणजे दिवाळी पहाट

नागपूर/प्रतिनिधी:
चंगळवादी, भोगवादी,ग्राहकवादी व आभासी दुनियेमुळे आपले जीवन जणू स्वार्थी बनले आहे. अशा परिस्थितीत, ऋतू बदल, नवे वस्त्र, स्वच्छता, वेगळा आहार, व्यवहार शिकवण, स्त्री सन्मान, व्यक्तिगत नातेसंबंध, इतरांप्रती प्रेमभाव, उत्तम आचार, विचार व संस्कारासह आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे खरी "दिवाळी". एक छोटी पणती आपल्या तेजाने लगतचा परिसर प्रकाशमान करते, अगदी त्याचप्रमाणे, प्रत्येकाने आपल्या निसर्गदत्त गुणांनी आपला परिसर तेजोमय करण्याची शिकवण दिवाळी या सणापासून मिळते. 
कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांचे विद्युत वसाहत कोराडी येथील निवासस्थानी "दिवाळी पहाट" या संगीतमय कार्यक्रमाचे लक्ष्मीपूजनाच्या दिनी आयोजन करण्यात आले. 
पहाटेच्या गारव्यात व मंद प्रकाशात "एक दंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही" या श्रीगणेश स्तवनाने सारंग जोशी यांनी दमदार सुरुवात केली व त्यानंतर "घनश्याम सुंदरा श्रीधरा","प्रभाते सूर नभी रंगती","गगन सदन तेजोमय" "ही गुलाबी हवा वेड लावी जिवा","केव्हा तरी पहाटे" हि पहाट गीते सादर करण्यात आली. त्यानंतर, "कानडा राजा पंढरीचा", "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" सारख्या भक्ती गीतांनी कार्यक्रमाला अध्यात्मिक साज चढला. एकाहून सरस एक अशी भाव गीते सादर करण्यात आली.त्यात "डौल मोराच्या मानचा","फुलले रे क्षण माझे","मेहंदीच्या पानावर", "मायेच्या हळव्या स्पर्शाने", "जांभूळ पिकल्या झाडयाखाली" "जीवनात ही घडी अशीच राहू दे","मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा" इत्यादी गीतांचा समावेश होता. समारोपीय सत्रात "रंगात रंग तो श्याम रंग", "आई भवानी तुझ्या कृपेने","मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून", उदे ग अंबे उदे, जयोस्तुते, सारख्या लोकप्रिय गीतांनी दिवाळी पहाट कार्यक्रमास कळस चढविला. 

नागपुरातील सुप्रसिद्ध गायक सारंग जोशी, सोनाली दीक्षित व मोनिका देशमुख तर वादक मंडळींमध्ये राजा राठोड(की बोर्ड), प्रशांत नागमोते(तबला), श्याम ओझा(संवादिनी), राजू ठाकूर(ऑक्टोपॅड) आणि सूत्रसंचालनातून डॉ.मनोज साल्पेकर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने दिवाळी पहाटचे सुरेल गुंफण करीत उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शंकर महादेवन,आशा भोसले, सुधीर फडके,स्वप्नील बांदोडकर, यशवंत देव, सुरेश भट,हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीधर फडके यांच्या गीतांमुळे दिवाळी मंगलमय पहाट अधिकच दर्जेदार झाली. 

राज्याचे ऊर्जावान ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे ह्या कार्यक्रमास सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वीज उत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व आगामी आव्हानांकरिता सहकार्य करण्याचे सूतोवाच केले. 

ह्या कार्यक्रमाला महानिर्मितीचे कार्यकारी संचालक राजू बुरडे, मुख्य अभियंते राजकुमार तासकर, राजेश पाटील तसेच महादुला नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजेश रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. "दिवाळी पहाट" सारख्या कार्यक्रमातून नवी ऊर्जा, भेटीगाठी व नाती संबंध अधिक दृढ होत असल्याचे अभय हरणे यांनी सांगितले.
अभय हरणे यांनी मागील वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे कौटुंबिक आयोजन सुरू केले असून ह्या कार्यक्रमास महानिर्मितीचे आजी-माजी अधिकारी,अभियंते, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, पत्रकार मंडळी व कोराडी वसाहतवासी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित असतात हे विशेष. प्रवीण बुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. गरमागरम अश्या स्वादिष्ट दिवाळी फराळाने संगीतमय पर्वाची सांगता झाली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.