महानिर्मितीतर्फे ७१३०५ वृक्षलागवडीचा विक्रम
३१ जुलैपर्यंत १५६७५ अतिरिक्त बांबूची लागवड
सप्टेंबर २०१८ पर्यंत २०००० अतिरिक्त बांबू लागवडीचे नियोजन
नागपूर/प्रतिनिधी: वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल आणि मानवी जीवनावरील प्रतिकूल परिणामांची गंभीरता लक्षात घेता महानिर्मितीच्या राज्यभरातील औष्णिक,जल,वायू,सौर वीज केंद्र,प्रकल्प, प्रशासकीय कार्यालये,कर्मचारी वसाहत व लगतच्या परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचा री व कुटुंबीयांच्या उत्स्फूर्त सहभागातून संकल्पापेक्षा अधिक म्हणजे जवळपास १२९ टक्के वृक्षलागवड केल्याबद्दल महानिर्मितीच्या सर्व अधिकारी-कर्मचारी व कुटुंबियांचे महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी अभिनंदन केले आहे.
महानिर्मितीला यावर्षी सुमारे ५५००० वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार जनजागरणपर कार्यक्रमांचे आयोजन, वृक्षारोपण मोहिमेचा प्रचार-प्रसार, वृक्षदिंडी सारखे कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्यात अधिकारी-अभियंते-तंत्रज्ञ-कर् मचारी,कंत्राटी कामगार, कंत्राटदार ,पुरवठादार, वसाहत कुटुंबीय, शालेय विद्यार्थी तसेच पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्था यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला व तब्बल ७१३०५ इतकी विक्रमी वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये, चंद्रपूर ३४०००,कोराडी २१५०, खापरखेडा २२८५, पारस १९२५, परळी ३३००, भुसावळ ४८५०,नाशिक २०४३०, उरण २००, पोफळी १५००, पुणे सौर ३५०, नाशिक सौर ३१५ असे एकूण ७१३०५ झाडांची वृक्षलागवड करण्यात आली.
सुमारे, ३ ते १० फुट उंचीच्या खैर, कवठ, चिंच, जांभूळ, सीताफळ, तेतू, आवळा, रिठा, वड, बेल, बहावा, शिसम, मोह, कडूनिंब, अर्जुन, पिंपळ, महागोनी, आंबा, गुलमोहर, अशोक, सप्तपर्णी, करंजी, लिंबू, बदाम, पेरू, फणस, चिकू, चाफा, नारळ, काशीद, काजू, सागवान, सुपारी, सुरु, ओक, बॉटलब्रश, रेनट्री इत्यादी वनस्पतींचा समावेश आहे.
वरील वृक्षारोपणा व्यतिरिक्त, औष्णिक विद्युत केंद्र राख बंधारा सभोवताल परिसर तसेच वीज केंद्र परिसरात बांबूची झाडे लावण्याचे नियोजन देखील करण्यात आले त्यामध्ये, चंद्रपूर ६०००, कोराडी २२००, खापरखेडा ४३००, पारस १८७५, नाशिक २१५०० असे एकूण ३५८७५ बांबू झाडांपैकी ३१ जुलैपर्यंत १५८७५ बांबू झाडे लावण्यात आली आहेत व सप्टेंबर २०१८ पर्यंत उर्वरित २०००० बांबू झाडे लावण्यात येणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री नामदार मदन येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीने वृक्षारोपण मोहीम अत्यंत नियोजनपूर्ण यशस्वीपणे राबविली. यामध्ये महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, संतोष आंबेरकर, श्याम वर्धने, कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, कैलाश चिरूटकर, राजू बुरडे, सतीश चवरे, प्रदीप शिंगाडे, नितीन चांदूरकर औष्णिक, जल, वायू, सौर वीज केंद्रांचे मुख्य अभियंते, विभाग प्रमुख व टीम महाजेनकोचा सिंहाचा वाटा आहे.
सन २०१९ मध्ये राज्य शासनाचे ३३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजनअसल्याने टीम महाजेनकोने आतापासूनच तयारीला लागावे व हिरवागार परिसर/ हरितपट्टा विकसित करण्यासोबतच लावलेली झाडे जगविण्यासाठी महानिर्मिती परिवाराने कसोशीने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केली.