Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

चंद्रपुरात बांबूपासून 50 हजार राख्यांची निर्मिती

ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते बीआरटीसीच्या प्रकल्पाचा शुभारंभ 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बांबूपासून सायकल, बांबूपासून कपडे, बांबूपासून घरातील शोभिवंत वस्तू, बांबूपासून गणरायाची मूर्ती ते बांबूपासून आता राखी बनविण्याचा नवा प्रकल्प चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत (बीआरटीसी) राबविण्यात आला आहे. या प्रशिक्षण केंद्रात चक्क 50 हजार राख्या बांबूपासून तयार करण्यात आल्या असून राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या करकमलावर रक्षाबंधन करुन या केंद्राने राखी विक्रीस सुरुवात केली आहे. 
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली. त्यानंतर या केंद्रामार्फत विविध प्रयोग सुरु असून हे केंद्र हजारो बेरोजगारांना रोजगार देणारे केंद्र म्हणून पुढे येत आहेत. या संस्थेमार्फत बांबू आधारित विविध प्रकल्प पोंभूर्णा, मूल, बल्लारपूर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलाना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 
नागपूर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय टि.एस. के रेड्डी यांनी चंद्रपूरच्या केंद्राने आता राखी निर्मिती करावी, अशी संकल्पना मांडली. त्यानुसार या केंद्राचे नेतृत्व करणारे तरुण आयएफएस अधिकारी संचालक राहुल पाटील यांनी या निर्मितीमध्ये या ठिकाणच्या प्रशिक्षित कर्मचा-यांना निर्देश दिले आणि हे केद्र बहीन भावाच्या पवित्र सणासाठी राखी बनवायला सिध्द झाले. 
बचत गटातील महिलांनी बांबूपासून बनवलेली ही अनोखी राखी पर्यावरण पुरक आहे. तशीच ती स्पर्धेतील राख्यांनाही मागे टाकणारी आहे. या सुंदर राख्यांच्या निर्मितीबद्दल या केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्या टिमचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे. चिचपल्ली येथे बांबू संशोधन केंद्राची संपूर्ण बांबूपासून तयार होणारी इमारत आकारास येत असून या इमारतीची दखल सिंगापूर सारख्या देशातील माध्यमांनी घेतली आहे. अशा प्रकारची भारतातील ही पहिलीच इमारत आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये बांबू संदर्भातील अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले असून चंद्रपूर शहरामध्ये नागपूर रोडवर बांबूपासून तयार झालेल्या वस्तूंचे दालनही सुरु झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात या केंद्रात तयार झालेला तिरंगा पोहचला असून चित्रपट सुष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही बांबूपासून बनलेल्या वस्तूंचे कौतुक केले आहे. आगामी काळात या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र म्हणून रोजगार निर्मितीची अपेक्षा या केंद्राकडून केली जात आहे. 
महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर व बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या संयुक्त विद्यामातून पोंभूर्णा व मुल तालुक्यातील सीएफसी केंद्रामध्ये बांबूपासून हस्तशिल्पाद्वारे घरसजावटी सोबत अनेक शोभेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण बचत गटातील महिलांना दिल्या जाते. बांबूपासून निर्मित पर्यावरण पूरक राखी ही यातीलच एक प्रयोग, ग्रामीण भागातील एक हजार गरीब व गरजू महिलांना या प्रशिक्षणाद्वारे शास्वत उपजीविकेचे साधन निर्मितीच्या उदेशाने बीआरटीसी व माविम हे शासकीय महामंडळ करारबद्ध झालेले आहेत. 
काल मंगळवारी नगरपरिषद बल्लारपूर येथे झालेल्या कार्यक्रमात बचत गटातील या महिलांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तकमलावर ही राखी बांधली व या राखीचे लोकार्पण समारंभ पार पडला. ना.मुनगंटीवार यांनी बचत गटातील महिला भगिनींनी बनवलेल्या या राखीची खरेदी करावी. पर्यावरण पूरक राखी रक्षाबंधनात वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. आज घडीला एकंदरीत 50 हजार राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,आमदार संजय धोटे,नगराध्यक्ष हरीश शर्मा, मीना चौधरी, उपविभागीय आधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी श्री.विपिन मुदधा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय आधिकारी नरेश उगेमुगे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.