- मुख्य वनसंरक्षकांच्या मार्फतीने प्रधान सचीव, वने यांना निवेदन
- - 'मागेल त्याला सौर ऊर्जा कुंपन' योजना राबविण्याची मागणी
चंद्रपूरः विदर्भातील वनव्याप्त शेतातील शेतपीक संरक्षण व व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपन’ योजना वनव्याप्त शेतशिवारात अनुदान तत्वावर राबविण्याच्या मागणीकरीता इको-प्रो संस्थेच्या वतीने ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढलेला असुन रानडुक्कर व रोही मुळे शेतपीक नुकसानीत प्रचंड वाढ झालेली आहे. याकरीता संपुर्ण विदर्भातील वनालगतच्या शेतशिवारात वन्यप्राण्यांकडुन होणारे शेतपीक नुकसान वाचविण्याकरीता मोठया प्रमाणात तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात येत आहे. शेतशिवारात आलेल्या रानडुक्कर व रोही या वन्यप्राण्यांच्या मागे त्यांची शिकार करण्याकरीता वाघांचा वावर शेतशिवारात सहज बाब झाली आहे. त्यामुळे मागील वर्षभरात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, नागपूर आणी चंद्रपूर जिल्हयास लागुन असलेल्या कागजनगर जिल्हयात एकुण 7 वाघ मृत्युच्या घटना समोर आलेल्या आहेत. तसेच चंद्रपूर जिल्हयात वाघ व्यतीरीक्त रानगवे व अन्य वन्यप्राणी सुध्दा मृत झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवाना सुध्दा कायदेशीर कार्यवाहीस सामोरं जावे लागत आहे.
वनव्याप्त गावातील शेतशिवारात शेतपीक नुकसान समस्या सोडविण्यासाठी आणी वाघ व अन्य वन्यप्राणी यांचे संरक्षण करण्याकरीता इको-प्रो च्या वतीने वेळोवेळी वनविभाग, वनमंत्री व शासनाकडे मागणी लावुन धरण्यात आलेली आहे. याव्दारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर ‘व्यक्तीगत पातळीवर सौर उर्जा कुंपन’ अनुदान तत्वावर जिल्हयातील प्रादेशिक वनक्षेत्रातील गावांना सुध्दा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याच मागणीच्या अनुषंगाने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपन’ ही योजना शासनाने राबवावी या मागणीकरीता येत्या बुधवार, 20 डिंसेबर 2017 रोजी स्थानीक मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ करण्यात येणार आहे.
याबाबतचे एक निवेदन इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने श्री विजय शेळके, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त यांच्या मार्फतीने श्री विकास खारगे, प्रधान सचिव, वने, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आलेले आहे. यावेळी इको-प्रो वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर, धर्मेद्र लुनावत, अमोल उटट्लवार, हरीश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतपीक नुकसान समस्याः
विदर्भातील शेतकरी कोरडवाहु शेती करणारा मोठा वर्ग आहे. जेमतेम एक पिकावर शेतकरीचे वर्षभराचा अर्थशास्त्र अवलंबुन आहे. उभे पिक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतकऱ्याकडुन केले जाते. वन्यप्राण्यांपासुन शेतपीक वाचविण्याकरीता शेतकरी बांधवाकडुन अशा पध्दतीने विदयुत तारेचे कुंपन शेताभोवती करून त्यात जिंवत विदयुत प्रवाह सोडला जातो. कारण, विदर्भातील शेतकरीची ‘अस्मानी आणी सुलतानी’ संकटातुन वाचलेले पिक वन्यप्राण्यापासुन वाचविण्याकरीता स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शेतात जिवंत विदयुत प्रवाह सोडतात. अशा चुकीच्या पध्दतीने आपला जिव जाईल हे माहीती असतांना सुध्दा असे प्रयत्न राजरोसपणे सुरू आहेत. विदयुत प्रवाहाने शेतकरीच मरण्याच्या घटना जिल्हयात व विदर्भात घडलेल्या आहेत. अशा चुकीच्या पध्दतीने विदयुत प्रवाह शेतात सोडणे हे नक्कीच समर्थनीय नाही. परंतु, ही सर्व धडपड वन्यप्राण्यापासुन उभे पिक वाचविण्यासाठी असते. आणी या शेतशिवारात रानडुक्कर व रोही या प्राण्यांच्या मागे त्यांची शिकार करण्याच्या उददेशाने वाघ सुध्दा शेतात येतो. शेतात तारेच्या कुपंनात लावण्यात आलेल्या विदयुत प्रवाहाने वाघ व अन्य वन्यप्राणी मृत्युच्या घटना घडत असतात.
वाघांचे स्थंलातरः
अलीकडे काही वर्षात ताडोबा लॅण्डस्केप मधील चंद्रपूर जिल्हयातील वनक्षेत्रात तसेच विदर्भातील काही वनक्षेत्रात वाघांची संख्येत भर पडली आहे. त्यामुळे एका वनक्षेत्रातुन दुसऱ्या वनक्षेत्रात वाघांचे होणारे स्थलांतर सुध्दा वाढलेले आहे. वाघ स्थंलातर करतांना त्यांचे भ्रमणमार्ग हे फक्त वनक्षेत्रच नसते. वाघ हे शेतशिवार, गावे, हायवे हे सर्व ओलांडुन पुढील वनक्षेत्राचा शेकडो किमीचा प्रवास पुर्ण करतात. तसेच वाघांच्या भ्रमणमार्गात येणारे वनव्याप्त गावातील शेती, वनालगत असलेले शेतशिवारातुन सुध्दा प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान किंवा शेतशिवारात येणारे रानडुक्कर, निलगाय व इतर तृणभक्षी प्राणी तसेच शेतशिवारातील पाळीव प्राण्याची शिकार करण्यास वाघ येतो. मात्र अशा शेतशिवारात जिथे शेतकऱ्याने शेतपीक संरक्षणाकरीता जिवंत विदयुत प्रवाह सोडलेला असल्यास तिथे वाघांसाठी धोका संभवतो.
व्याघ्र संवर्धनापुढील आवाहनः
विदर्भातील वर्षभरात विदयुत प्रवाहाने मृत्युमुखी पडलेले वाघ म्हणजे भविष्यातील व्याघ्र संवर्धनापुढील मोठे आवाहन असुन वाघांसाठी धोक्याची घंटा आहे. यावर वेळीच सावध होउन योग्य उपाययोजना न आखण्यात आल्यास ही मोठी समस्या ठरेल. विदर्भातील वाढती वाघांची संख्या आणी शेतपीक वाचविण्याकरीता शेतकरी बांधवाकडुन होणारे प्रयत्न म्हणजे शेतकरी विरूध्द वाघ पर्यायाने वनविभाग असा नवा संघर्ष उभा ठाकण्याची दाट शक्यता आहे.