Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

मोकाट कुत्र्यांवर नसबंदी

नागपूर : मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका १५ दिवसात नसबंदीचा उपक्रम पुन्हा राबविणार आहे. यासाठी दोन संस्थांसोबत करार करण्यात आला आहे.
दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. मोकाट कुत्र्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासन नसबंदीचा व्यापक उपक्रम राबविणार आहे.

शहरात ९० हजार मोकाट कुत्रे
नागपूर शहरात ८० ते ९० हजार मोकाट कुत्री आहेत. त्यामुळे नसबंदी केलेल्या कुत्र्यांची ओळख पटावी. यासाठी त्यांना निशाणी लावली जाणार आहे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांचा कान कापणे अथवा बिल्ला लावण्याचा विचार आहे. मात्र बिल्ला पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कापण्याचा विचार केला जात आहे.

शहरालगतच्या भागावर लक्ष
मोकाट कुत्र्यांची संख्या प्रामुख्याने शहरालगतच्या भागात जास्त व मध्यवर्ती भागात कमी भागात आहे. त्यामुळे नसबंदी उपक्रमाला या भागातून सुरुवात करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक असलेल्या भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. साधारणपणे नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या तीन टक्के असते. कुत्र्यांची प्रभागनिहाय गणना करताना प्रभागातील लोकसंख्या व कुत्र्यांची संख्या याची सरासरी संकलित केली जात आहे. यापूर्वी नसबंदी करण्यात आलेले, नसबंदी न झालेल्या कुत्र्यांचा डाटा तयार करणार आहे. सोबतच कुत्र्यांची लहान पिले व गर्भधारणा झालेल्या कुत्र्यांचीही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर येथील व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेवर गणनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.