Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७

महामानवाचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर

काव्यशिल्प /ऑनलाइन:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे.या अध्यादेशानुसार विद्यार्थी ७ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत.

                 ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जि. सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. इतकेच नव्हे तर ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
               परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्याव्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला, हे विशेष.
                कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे शासनाने या अध्यादेशानुसार जाहीर केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठपुराव्यास उचित न्याय दिला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.